मेट्रो रिजनमुळे व्याप वाढला : विकासावर परिणामाची शक्यता नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) बरखास्त करण्याची मागणी होत असली तरी, नासुप्रवर मेट्रो रिजनची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच हाऊ सिंग फॉर आॅल हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. येथे मुख्य अभियंत्याचे पद निर्माण करण्यात आले आहे. परंतु सभापती श्याम वर्धने यांची राज्याचे परिवहन आयुक्तपदी बदली झाल्यानंतर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे नवीन सभापतींची नियुक्ती कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरालगतच्या २५ किलोमीटरचा परिसराचा मेट्रो रिजनमध्ये समावेश करण्यात आला आहे. मेट्रो रिजन आराखड्यावर ६५०० आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यावर सुनावणी घेण्यात आली आहे. सुनावणीनंतर आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. परंतु पूर्णवेळ सभापती नसल्याने या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सभापती पदासाठी अनेक नावांची चर्चा आहे. परंतु अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांना आपल्या मर्जीतील अधिकारी हवा आहे. नासुप्रच्या कामकाजात सुधारणा करण्यासोबतच त्याने महापालिकेला अपेक्षित काम करावे, अशी अपेक्षा आहे. सर्वसामान्यांत नासुप्रची प्रतिमा चांगली नाही. सत्तेत येण्यापूर्वी भाजप नेत्यांनी नासुप्र बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यातच स्मार्ट सिटीत निवड न होण्याचे खापर नासुप्रच्या डोक्यावर फोडण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर भाजप नेत्यांनी पुन्हा नासुप्रला बरखास्त करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे शासनाने नासुप्रवर मेट्रो रिजन, हाऊ सिंग फॉर आॅल अशा प्रकल्पांची जबाबदारी सोपविली आहे.(प्रतिनिधी)विश्वस्त पदावर नाखूशभाजपचे आमदार सुधाकर देशमुख यांची नासुप्रच्या विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे. परंतु त्यांनी अद्याप या पदाची सूत्रे स्वीकारली नाही. ते यासाठी इच्छुक नसल्याचे समजते. सध्या नासुप्रत स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे व भूषण शिंगणे हे दोनच विश्वस्त आहेत. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेण्याला मर्यादा आल्या आहेत. नवीन विश्वस्तासंदर्भात अद्याप शासनाने निर्णय घेतलेला नाही.
नासुप्र सभापतींची नियुक्ती केव्हा?
By admin | Published: February 02, 2016 2:47 AM