लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील बारावीचे तसेच ‘एमएचटीसीईटी’चे निकाल जाहीर झाल्याने आता विद्यार्थ्यांचे डोळे प्रवेशाकडे लागले आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे हे वेळापत्रक जाहीर होणार तरी कधी, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे. नागपूर विभागातील ५६ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या एकूण २१,२२१ जागा आहेत. ‘जेईई-मेन्स’ आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक व प्रवेशप्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारणा होत आहे. मात्र तंत्रशिक्षण संचालनालयाकडून अद्यापही वेळापत्रक जारी करण्यात आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात वेळापत्रक जारी होण्याची शक्यता आहे.
बनावट प्रमाणपत्र आणल्यास गुन्हा दाखल होणारदरम्यान, प्रवेशप्रक्रियेदरम्यान बनावट प्रमाणपत्र अथवा कागदपत्रे सादर केल्यास विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होतील व त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा तंत्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आला आहे. २०१६-१७ च्या शैक्षणिक वर्षात अनेक जणांनी जातवैधता, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बनावट पद्धतीची सादर केली होती. त्यांच्याविरोधातदेखील फौजदारी कारवाई करण्यात आली होती.