लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर आणि विदर्भात कोरोना प्रकोप प्रचंड वाढला आहे. रुग्णांना बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा आहे. रेमडेसिविर उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष नागपूर-विदर्भावर नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केला आहे.
कोरोना विरूद्धच्या लढाईत मुख्यमंत्र्यांनी मुंबईत व उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात जंबो हॉस्पिटल्स उभारले आहेत. मात्र, गेल्या १४ महिन्यात नागपुरात पाच हजार बेड्सच्या जंबो हॉस्पिटलची व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हॉस्पिटल केलेली घोषणा हवेत विरली आहे. सगळीकडे अनागोंदी कारभार माजला आहे. पालकमंत्र्यांकडे निधी उपलब्ध होत नसावा म्हणून त्यांचेही प्रयत्न अपुरे पडत आहेत. लोक रस्त्यावर मरून पडत आहेत. प्रशासन हतबल दिसत आहे. नागपुरातील कोरोना रुग्णांना वाचविण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचेही देशमुख म्हटले आहे.