भिवापूर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना भिवापूर तालुक्यात गतवर्षी संक्रमणाचा वेग कमी होता. बाधितांची संख्याही आटोक्यात होती. आता मात्र दिवसाकाठी शहरात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. तालुक्यात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्या तरी नागरिकांकडून नियमावलीचे पालनच होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना मास्कचे महत्त्व कधी कळणार, असा प्रश्न आता प्रशासनाला पडला आहे. गत दोन दिवसापासून शहरात व तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. सोमवारी ५ तर मंगळवारी ३ रुग्णांची नोंद झाली. प्रशासनाकडून विनामास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र ९० टक्के नागरिकांकडून मास्कचा वापर होत नसल्यामुळे कारवाई करणाऱ्या पथकाचे हात कमी पडत आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. मास्कचा वापरच होत नसेल तर स्वयंस्फूर्तीच्या बंदमधूनही अपेक्षित निकाल मिळणार नाही, असा सूर प्रशासनाकडून उमटत आहे. गतवेळी कोरोना संसर्गामुळे तालुक्यात व शहरात मृतांच्या संख्येने हळहळ व्यक्त केली गेली. अनेकांच्या घरातील कर्ताधर्ता व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे किमान आतातरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
नागरिकांना मास्कचे महत्त्व कळणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:15 AM