लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : बाेथिया पालाेरा (ता. रामटेक) या ग्रामपंचायतला सन २०२०-२१ चा ५० लाख रुपयाचा जिल्हा नियाेजन समिती(डीपीसी)अंतर्गत नागरी सुविधा निधी मिळणे अपेक्षित असताना, हा निधी अद्यापही प्राप्त झाला नाही. त्यामुळे गावातील नागरी सुविधा प्रभावित झाल्या असून, हा निधी केव्हा प्राप्त हाेणार, असा प्रश्न सरपंच डाॅ. सुधीर नाखले यांनी उपस्थित केला आहे.
बाेथिया पालाेरा हे रामटेक तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील गाव आहे. या गावाची लाेकसंख्या ७,४५० च्या आसपास असून, या ग्रामपंचायतअंतर्गत नऊ महसुली गावांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा नियाेजन समितीमार्फत प्रत्येक गावाला दरवर्षी नागरी सुविधा निधी दिला जाताे. बाेथिया पालाेरा ग्रामपंचायतला सन २०२०-२१ मधील ५० लाख रुपयाचा हा नागरी सुविधा निधी मिळायला हवा हाेता.
हा निधी देण्यासाठी व विकास कामे करण्यासाठी काही राजकीय नेते ४ टक्क्यांची मागणी करतात. आपण ही मागणी पूर्ण करण्यास स्पष्ट नकार दिल्याने, आपल्याला हा निधी देण्यास मुद्दाम दिरंगाई केली जात आहे, असा आराेपही सरपंच डाॅ. सुरेश नाखले यांनी केला. हा निधी दुसऱ्या ग्रामपंचायतला दिला जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. हा निधी तातडीने मिळावा, यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री नितीन राऊत, खा. कृपाल तुमाने, आ. आशिष जायस्वाल, जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांना पत्रव्यवहार केला आहे, असेही सरपंच डाॅ. सुरेश नाखले यांनी सांगितले असून, निधी मिळवून देण्याची मागणी केली आहे.