लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : ऐतिहासिक पुरातन किल्ल्यालगतच्या पुलाचे बांधकाम सुमारे दोन महिन्यांपासून सुरू आहे. मागील काही दिवसांपासून काम थंडबस्त्यात असल्याने या मुख्य पुलाचे बांधकाम कधी पूर्ण होणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत. पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्याने या मार्गाने वहिवाट बंद झाली आहे.
उमरेडकरांना नागपूरला जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग पडतात. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौक आणि नगर परिषद कार्यालय, किल्ला तसेच कावरापेठ, गांगापूर या मार्गाचा समावेश आहे. बहुतांश नागरिक किल्ल्यानजीकच्या मार्गाचा वापर करतात. रस्ता अरुंद असल्याने याठिकाणी नेहमीच अपघात होत असे. नगरपालिका ते गांगापूरपर्यंतचा रस्ता तयार केला गेला. यादरम्यान पुलाचे काम करण्यात आले नाही. अशातच १४व्या वित्त आयोगातून ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर होत काम सुरू करण्यात आले.
यामध्ये या पुलाचे बांधकाम आणि नाला बांधकाम तसेच दुर्गा मंदिरापर्यंत रस्त्याच्या कामाचा समावेश आहे. या मोठ्या नाल्यातून गावतलावातील पाण्याचा ओव्हरफ्लाे जातो. पुलाला लागूनच छोटीशी बोडी आहे. यामुळे याठिकाणी वारंवार पाणी जमा होत असते. दोन महिन्यांपासून पावसामुळे काम रेंगाळले, अशी माहिती पालिकेचे कनिष्ठ अभियंता जगदीश पटेल यांनी दिली.
मुख्य मार्ग असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. शिवाय कावरापेठ, गांगापूर परिसरातील नागरिकांनाही विविध समस्येला सामोरे जावे लागत आहे. तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी देवानंद कळंबे, अशोक चौधरी, प्रभाकर क्षीरसागर, अजय जुनघरे, रवींद्र चट्टे, रूपेश मोंगसे, मधुकर दहाघाने, गंगाधर बेले, संदीप वाघे, शंकर सावरकर, रामेश्वर चट्टे, विक्की शिवनकर, कैलास कदरेवार आदींनी केली आहे.
....
धोक्याचा मार्ग
उमरेड किल्ल्यालगतच्या पुलाचे काम सुरू असल्याने गावतलावापासूनच्या अरुंद मार्गावरून चारचाकी, दुचाकी वाहने सुसाट वेगाने जात आहेत. यामुळे अनेकदा अपघाताचाही प्रकार झाला असून, हा मार्ग धोक्याचा ठरत आहे.
....
बाजूलाच तलाव असल्याने आणि गाव तलावाचा ओव्हरफ्लाे जोडला गेला असल्याने पाऊस आल्यानंतर काम थांबवावे लागते. पाणी साचते. यामुळे कामाला उशीर होत आहे. आता पुलाचा पाया बनलेला असून, लवकरच काम पूर्ण होणार आहे.
- जगदीश पटेल, कनिष्ठ अभियंता, नगरपालिका, उमरेड