धापेवाडा : विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथे ग्रामपंचायत ते बाजार चौक या मुख्य रस्त्याची सध्या दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे पाणी साचत असल्याने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागतो. ग्रामपंचायत ते बाजार चौक या सिमेंट रस्त्याचे अनेक वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले होते; मात्र रस्त्याचे बांधकाम करताना सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी योग्यप्रकारे नियोजन करण्यात आले नसल्याने पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचून चिखल तयार होतो. रस्त्यावर खड्डे पडल्यानेही तेथे छोट्या आकाराचे तळे तयार होत असल्याची वास्तविक परिस्थिती आहे.
धापेवाडा खुर्द ते धापेवाडा(बु.) रस्ता वाहनांसाठी बंद
काही महिन्यांपूर्वी चंद्रभागा नदीचे खोलीकरण करण्यात आले. नदीच्या पात्राची स्वच्छता करण्यात आली होती. त्यामुळे धापेवाडा खुर्द ते धापेवाडा बु. येथे जाणारे नदीच्या पात्रातील रस्ते नदीच्या पाण्यामुळे बंद झाले आहेत. लोकांनी पायी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कशीबशी व्यवस्था केली असून, वाहनांसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. धापेवाडा खुर्द येथून धापेवाडा बु. येथे वाहनाने जाण्यासाठी सध्या एकमेव पूल असून, सावनेर-कळमेश्व या राज्य महामार्गाचे काम सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
चंद्रभागेच्या पात्रात झुडपे वाढली
चंद्रभागेच्या पात्रात झाडेझुडपे वाढल्याने तसेच गावातील सांडपाणी वाहत असल्याने दरवर्षी चंद्रभागेची दुरवस्था होते. त्यामुळे कार्तिक रथयात्रेनिमित्त ग्रामपंचायतीच्यावतीने चंद्रभागेच्या पात्राची स्वच्छता केली जाते; मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे रथयात्रा रद्द करण्यात आल्याने ग्रामपंचायतीने नदीच्या पात्राची स्वच्छता करण्यात आली नाही. परिणामी चंद्रभागा नदीच्या पात्राची खूप मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.