लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहर स्मार्ट होत आहे. परंतु शहर विकासाची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या महाल येथील श्रीमंत राजे रघुजीराव भोसले नगर भवन सभागृहात (टाऊन हॉल) ऐतिहासिक निर्णय झाले. परंतु या सभागृहाची अवस्था चांगली नाही. सभागृह अद्ययावत बांधण्याचा प्रस्ताव मागील सात वर्षापासून विचाराधीन आहे. दरवर्षीच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूदही केली जाते. मात्र या प्रकल्पाचे स्वप्न प्रत्यक्ष कधी पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२०१४-१५ या वर्षापासून टाऊन हॉलसाठी मनपाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. २०२०-२१ या वर्षाच्या अर्थसंकल्पातही पहिल्या टप्प्याच्या कामासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र कामाला सुरुवात होईलच याची शाश्वती नाही.
....
बाजार विकास व फूड मॉलचा प्रस्तावही प्रलंबित
नागपूर शहरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांचा माल थेट बाजारात विकण्याच्या दृष्टीने सहकारी संस्थेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना माफक दरात ताजा भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी बाजार विकास व फूड मॉलचा प्रस्ताव मागील अनेक वर्षापासून विचाराधीन आहे. परंतु यावर प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. या प्रकल्पासाठी १० कोटीची तरतूद केली आहे.
...
बुधवार बाजार कधी होणार
महाल येथील बुधवार बाजार विकासाचा प्रस्ताव असाच काही वर्षापासून प्रलंबित आहे. या प्रकल्पासाठी २५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. निविदा काढण्यात आल्या आहेत.
....
कामाला लवकरच सुरुवात
टाऊन हॉल प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याला लवकरच मंजुरी दिली. जाईल. अर्थसंकल्पात पहिल्या टप्प्यासाठी तरतूद केली आहे. गरजेनुसार त्यात वाढ केली जाईल. या प्रकल्पाच्या कामाला लवकर सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे.
विजय झलके, अध्यक्ष स्थायी समिती मनपा