मौदा : तालुक्यातील नांदगाव येथील कारगाव-शिवधुरा हा पांदन रस्ता अरोली-नांदगाव येथून गेला असून याठिकाणी येथील काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. सदर अतिक्रमणाबाबत येथील शेतकऱ्यांची ग्रामपंचायतीकडे तक्रार करण्यात आली आहे. यावर तोडगा निघावा, यासाठी सरपंच बबिता सलामे यांनी कारगाव शिवारातील पांदन रस्त्याची मोजणी करून येथील अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे, अशा आशयाचे पत्र तहसीलदारांना वर्षभरापूर्वी दिले होते.
तहसीलदारांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना सदर पांदन रस्त्याची पाहणी करण्याचे निर्देश दिले. मात्र त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्याकडून पाठबळ तर मिळत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत आ. आशिष जयस्वाल व तहसीलदार मौदा यांना पत्र दिले. परंतु अतिक्रमण करणाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. पांदन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी येथील काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येथील शेतकरी रमेश थोटे, प्रकाश थोटे, विशुलाल थोटे व सेवकराम सलामे यांना शेतात जाण्याचा मार्गच उरला नाही.