रामटेक : नगरपालिकेच्या जागेवर असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी व अतिक्रमण करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी १२ ऑगस्टपासून रामटेकच्या गांधी चाैकात तुळशीराम काेठेकर हे उपाेषणाला बसले आहेत. जाेवर येथील ७/१२ मिळत नाही ताेवर उपाेषण साेडणार नाही, अशी उपोषणकर्त्याची भूमिका आहे. यावर अद्यापही तोडगा निघाला नाही. माजी नगरसेवक चंद्रशेखर भाेयर व रामानंद अडामे हेही आंदोलनात सहभागी आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते उदयसिंग यादव यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. रामटेकचे तहसीलदार बाळासाहेब मस्के व मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी उपाेषण मंडपाला भेट देत याप्रकरणी कारवाई करण्यासंदर्भात प्रशासनाला वेळ देण्यात यावा. यासोबतच उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली आहे.
राज्य शासनाच्या महसूल व वन मंत्रालयाच्या ३० जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार देवस्थानच्या मालकीची जमीन वहिवाटधारकांना विकता येत नाही. रामटेक शहरातील परमानंद स्वामी देवस्थानची सर्व्हे क्र. १६६/२ मध्ये स्थावर मालमत्ता आहे. काहींनी ही जमीन अकृषक करून त्यावर भूखंड तयार केले. त्याची विक्री केली, असा तुळशीराम काेठेकर यांचा आरोप आहे.
महसूल विभागाच्या दस्तऐवजानुसार सर्व्हे क्र. १४२, १४५, १५०, १५१, १५२, १९६, १६९ व २४४ मधील जमीन रामटेक नगरपालिकेच्या हद्दीत आहे. मात्र त्या जागेवर नवरगाव आमगाव ग्रामपंचायत कर आकारणी करीत आहे. ही जमीन नगरपालिकेने ताब्यात घ्यावी व त्यावर कर आकारणी करावी, अशी या तीन माजी नगरसेवकांची मागणी आहे.
सिटी सर्व्हे क्र. १३८, १४७, १५०, १४८ व १४६ मधील जमिनीची आराजी ८१४१.८ व १०८८.५ चाै.मीटर आहे. या जागेवर साेनेघाट ग्रामपंचायतने अतिक्रमण करून कर आकारणी करीत आहे. कवडक वाॅर्ड व नवीन विनाेबा वाॅर्डमधील सर्व्हे क्र. २२० तसेच झुडपी सर्व्हे क्र. २२२, २२३ व २२४ या जागेवर गाळे व शाैचालय बांधकाम करण्यात आले असल्याचे काेठेकर यांनी सांगितले.
घरकुल परिसरातील अवैध धंदे बंद करा
दुधाळा येथे ७२ घरकुलाचे बांधकाम नगरपालिकेने केले. पण २० वर्षांपासून याचे याेग्य पद्धतीने वाटप केलेले नाही. त्यामुळे या घरकुलात अवैध धंदे सुरू आहेत. तेव्हा हे अतिक्रमण हटवून याेग्य पद्धतीने वाटप करावे, शहरामध्ये मूत्रीघराची व्यवस्था अपुरी आहे. त्यामुळे सुसज्ज मूत्रीघराची व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या उपाेषणकर्त्यांनी केल्या आहेत. आता यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.