लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या सराय झाेपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाही. त्यांना शासनाच्या काेणत्याही कल्याणकारी याेजनांचा लाभही घेता येत नाही. त्यांच्या वाट्याला आलेला हा वनवास कधी संपणार, असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत.
ही झाेपडपट्टी ५० वर्षांपूर्वी वसली आहे. येथे राहणारा प्रत्येक व्यक्ती मिळेल ते काम करून कुटुंबाची उपजीविका करतो. प्रशासनाने आपल्याला केवळ मूलभूत सुविधा द्याव्यात, अशी मागणी येथील नागरिकांनी अनेकदा केली. परंतु त्यांच्या या मागणीकडे कुणीही कधीच गांभीर्याने घेतले नाही. याच काळात त्यांची दुसरी पिढी अभावात जीवन व्यतित करीत आहे. विशेष म्हणजे, येथील बहुतांश नागरिकांची नावे मतदार यादीत असल्याने ते मतदानाचा नियमित हक्क बजावतात. मात्र, त्यांना शासनाच्या काेणत्याही याेजनेचा कधीच लाभ मिळाला नाही.
या भागात पिण्याच्या पाण्याची काेणतीही साेय अद्याप करण्यात आली नाही. पाण्याची पाईपलाईन टाकून सार्वजिक नळ देण्याचे औदार्यदेखील प्रशासनाने दाखविले नाही. त्यामुळे येथील नागरिक मिळेल तेथील पाणी पिऊन तहान शमवितात. सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यादेखील नाही. त्यामुळे या भागात ठिकठिकाणी डबके साचल्याचे व त्यात डासांची पैदास हाेत असल्याचे वाढत असून, त्यांच्या आराेग्यालाही धाेका उद्भवत आहे. या भागात सार्वजनिक शाैचालये नाही. आर्थिक परिस्थितीमुळे नागरिकांना घरी शाैचालयाचे बांधकाम करणे शक्य नाही. त्यामुळे तरुणी व महिलांची कुचंबणा हाेते. येथील नागरिकांना शिधापत्रिका देण्यात आल्या असल्या तरी त्यांना शासनाच्या घरकूल, उज्ज्वला गॅस यासह अन्य महत्त्वाच्या व वैयक्तिक लाभाच्या याेजनांचा लाभ घेता येत नाही.
---
नियमितीकरणाचे प्रयत्न
कामठी शहरात रामगड, सैलाबनगर, वारिसपुरा, आझादनगर, कामगारनगर या भागात झाेपडपट्ट्या असून, तिथे तळागाळातील नागरिक कुटुंबासह राहातात. यात सराय झाेपडपट्टी ही सर्वात जुनी आहे. मध्यंतरी सन १९९५ पूर्वी वसलेल्या झाेपडपट्ट्यांचे नियमितीकरण करण्याचे प्रयत्न करण्यात आले हाेते. परंतु यात सातत्य नसल्याने यश आले नाही. परिणामी, येथील नागरिकांना काेणत्याही मूलभूत सुविधा मिळाल्या नाही.