नागपूर : महाविकास आघाडीचं सरकार हे स्थगिती सरकार आहे. अद्याप या सरकारने खातेवाटपही केलं नाही, त्यामुळे नेमके कुणाला प्रश्न विचारायचे असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच, शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा होणार, सरसकट कर्जमाफी कधी होणार याचा किमान कार्यक्रम तरी जाहीर करावा, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
निवडणूक काळात या राजकीय पक्षांकडून जी सर्व आश्वासनेच होती, तीच आठवण आम्ही करून देत आहोत. सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये, हे सरकार स्थगिती सरकार असून महाराष्ट्र जवळजवळ ठप्प झाल्याचं दिसत आहे. सरकारच्या भूमिकेमुळे राज्यात असंतोष असून स्थगिती अशीच राहणार का? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
महाराष्ट्राच्या प्रतिमेवर सरकारच्या धोरणांचा परिणाम होत आहे. गुंतवणुकदारांवर परिणाम होतोय. त्यामुळे सरकारने तात्काळ कामं सुरु करावी. राष्ट्रीय पेयजलची कामे सुरू करावी. उन्हाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण व्हावी. विशेष म्हणजे, सरकारमध्ये जाणीवपूर्वक आर्थिक स्थितीबाबत दिशाभूल करणारी वक्तव्ये देण्यात येत आहे. कर्जाचा आकडा फुगवला जात आहे. आकड्यांची जुगलरी केली जात आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली आहे. आर्थिक स्थितीचे कारण सांगून सरकारने हात वर करू नये, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
सेना आमच्यासोबत सरकारमध्ये होती, तेव्हा एकमताने निर्णय झाले होते. आता, त्याच सेनेकडून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते निर्णय बदलावून घेत आहेत. सेनेची तेव्हा आमच्याइतकीच जबाबदारी होती, त्यांना उत्तर द्यावे लागेल. विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेचे मुद्दे मांडू. चर्चेची संधी दिली नाही तर आक्रमकपणे विविध आयुध वापरू. सत्तेतील पक्षांत विसंवाद आहे. सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारली जाईल हे सेनेला ठरवायचे आहे. सावरकर यांचा त्याग राहुल गांधींना माहिती नाही, असे म्हणत राहुल गांधींनी माफी मागवी, अशी मागणीही फडणवीस यांनी केलीय.