कोराडी : कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणली आहे. मात्र कोराडी येथील वीज वसाहतीत पहिल्या लॉकडाऊनपासून लावलेले निर्बंध अजूनही कायम आहेत. हे निर्बंध कायम ठेवण्याच्या भूमिकेवर कोराडी येथील वीज प्रशासन ठाम आहे. त्यामुळे वीज वसाहतीत प्रवेश करणाऱ्या सामान्य नागरिक, विद्यार्थी, कामगार, शेतमजुरांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सहा महिन्यांपासून आंदोलन निवेदन आदी मार्गाने यासाठी प्रयत्न झाले. मात्र महानिर्मितीच्या भूमिकेत कुठलाही फरक झालेला नाही. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून कोराडी येथील वीज प्रशासनाने कामगारांच्या वीज वसाहतीचे एक प्रवेशद्वार वगळता इतर सर्व प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे वीज वसाहतीत सर्वसामान्यांना प्रवेश अडचणींचा झाला आहे. या वसाहतीत दोन शाळा आहेत. या शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांना वारंवार जावे लागते, अशा वेळी त्यांना अडचणी येतात. कामगार आणि मजूर यांना वसाहतीच्या माध्यमातून महादुला-बोखारा या दोन गावांना जाणे सोयीस्कर आहे. शेतमजुरांना वीज वसाहतीच्या माध्यमातून शेतीवर जाता येते तसेच महादुला येथे महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे दोन्हीकडील सर्व्हिस मार्ग अरूंद झाले आहेत. त्यामुळे येथे सातत्याने वाहतूक कोंडी होते. अशात वीज वसाहतीचे इतर प्रवेशद्वार उघडल्यास वाहतुकीचा ताण काहीसा कमी होऊ शकतो. अनेकांना यातून सुविधा उपलब्ध होईल अशी मागणी अनेक नागरिकांची आहे. वीज वसाहतीचे प्रवेशद्वार क्रमांक एक भोगे लेआऊट ,धूळस लेआउट, बोखारा आदी बाजूचे प्रवेशद्वार खुले करा या मागणीसाठी भाजप व काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आली. परंतु प्रवेशद्वार उघडण्याच्या आश्वासना व्यतिरिक्त काही पदरात पडले नाही. महानिर्मितीच्या वतीने कामगार संघटनांचाही इतर प्रवेशद्वार बंद ठेवण्याला पाठिंबा असल्याचे वीज प्रशासनाकडून सांगितले जाते. परंतु कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता महानिर्मितीच्या वतीने या वसाहतीसाठी खाजगी व महानिर्मितीचे सुरक्षारक्षक ठेवण्यात येतात. प्रवेशद्वार बंद करण्यात आले असले तरी सुरक्षारक्षकांवरील खर्च मात्र कमी झालेला नाही.
नगराध्यक्ष करणार आंदोलन
वीज वसाहतीचे सर्व प्रवेशद्वार सर्वसामान्यांसाठी खुले करण्याबाबत महानिर्मिती प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी महादुला न.प.चे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी केली आहे. यासाठी त्यांनी २२ जुलैपर्यंत मुदत प्रशासनाला दिली आहे. अन्यथा २२ तारखेला वीज वसाहतीच्या प्रवेशद्वार क्रमांक दोन जवळ आंदोलन करण्याच्या इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे.
पोलिसांची समेटाची भूमिका
यासंदर्भात कोराडी पोलीस स्टेशनच्या वतीने महानिर्मितीला पत्र लिहून या विषयावर संबंधितांशी चर्चा करून तोडगा काढावा असे आवाहन केले आहे. कोरोना परिस्थितीचा विचार करता कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी महानिर्मितीच्या स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे अशीही विनंती करण्यात आली आहे.