आनंद डेकाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण विदर्भाचे चित्र पालटू शकेल, इतकी क्षमता असलेला गोसेखुर्द प्रकल्प गेल्या ३० वर्षांपासून रखडला आहे. सरकार बदलले. सध्याचे सरकार हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गंभीर असल्याचे सांगितले जाते. सरकारच्यावतीने वेळोवेळी तशा घोषणाही केल्या जातात. जून २०१९ मध्ये गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण होईल, अशा घोषणा झाल्या. परंतु अजूनही या प्रकल्पाला पाहिजे तशी गती मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती रविवारी या प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट दिल्यावर अनुभवास आली.विदर्भातील सिंचन प्रकल्पांची वस्तुस्थिती व समस्या जाणून घेणे आणि रखडलेली कामे तातडीने पूर्ण व्हावी, या उद्देशाने जनमंच, लोकनायक बापूजी अणे स्मारक समिती, वेद (विदर्भ इकोनॉमिकल डेव्हलपमेंट) आणि भारतीय किसान संघ या संघटनांतर्फे विदर्भ सिंचन शोध यात्रा काढण्यात आली. या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत रविवारी गोसेखुर्द प्रकल्पातील उजवा मुख्य कालवा व घोडाझरी शाखा कालव्याची पाहणी करण्यात आली. तेव्हा अतिशय धक्कादायक बाब उघडकीस आली. सिंचन शोध यात्रेदरम्यान तीन वर्षांपूर्वीसुद्धा या ठिकाणी भेट दिली होती. तेव्हा आणि आताच्या परिस्थितीत फार काही फरक पडल्याचे दिसून आले नाही. ३० ते ३५ किलोमीटर कालव्याचे काम झाले आहे. तिथे कालव्यात भर उन्हाळ्यात पाणी भरून आहे. दोन्ही बाजूंची शेती हिरवीगार आहे. परंतु त्याच्या पुढे मात्र भयाण परिस्थिती आहे. ४० व्या किलोमीटरवर पुलाच्या एका बाजूच्या मुख्य कालव्याचे सिमेंटचे अस्तरीकरण झाले आहे तर दुसऱ्या बाजूला झालेच नाही, अशी परिस्थिती आहे. अधिकाऱ्यांना विचारणा केली तर माती योग्य नसल्याने सिमेंटीकरण होऊ शकत नसल्याचे कारण सांगण्यात आले. हेच कारण तीन वर्षांपूर्वी सुद्धा सांगितले गेले होते. तीन वर्षात त्यावर तोडगा काढून कामाला सुरुवात झाल्याचे दिसून आले नाही. मुख्य कालवे झाले. उपकालवे व पाटचाऱ्या झालेल्या नाहीत, तीन वर्षांपूर्वी सुद्धा हीच स्थिती होती. तेव्हा शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या शेतात कधी पाणी येईल, याची प्रतीक्षा आहे. एकूणच परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही म्हणूनच गोसेखुर्द प्रकल्प आतातरी पूर्ण होणार का, असा प्रश्न या सिंचन शोध यात्रेत सहभागी पदाधिकाऱ्यांसह शेतकरी व सामान्यजनांना पडला.दूधवाही येथील गेट अपूर्णचउजव्या कालव्यावरील ४५.०१ किलोमीटरवर दूधवाही ता. ब्रह्मपुरी येथे गेटचे काम बंद पडले आहे. गेटचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडे या कालव्यावरील एकूण ५ ठिकाणचे काम आहे. ते आधीच पूर्ण व्हायला हवे होते. परंतु अजूनही झालेले नाही. अधिकाऱ्यांनी त्याला ३० जूनपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. त्यानंतर दर दिवसाप्रमाणे दंड आकारण्यात येईस, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर ३० जूननंतर कारवाई न झाल्यास व्हीआयडीसी विरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशारा जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी यावेळी दिला.
३७२ कोटीचा प्रकल्प पोहोचला १८,४०० कोटीवरतब्बल अडीच लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाची मूळ किंमत ही ३७२ कोटी रुपये होती. ती आज १८,४०० कोटींवर पोहोचली आहे. अजूनही प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ८,२०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. शासनाने यासाठी यंदा ७५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तितकेच पैसे विभागाकडे शिल्लक आहे. या वर्षीसाठी निधी पुरेसा असल्याचे अधिकारी सांगत असले तरी अशा तरतुदीमुळे प्रकल्प तातडीने पूर्ण होणे शक्य नाही.
घोडाझरी शाखा कालव्याकडे दुर्लक्षचगोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावर घोडाझरी हा मुख्य शाखा कालवा आहे. या कालव्यावरून एकूण ३५ हजार हेक्टरला सिंचन होणार आहे. नागभीड, सिंदेवाही, मूल आणि सावली या तालुक्यातील १२० गावांना याचा फायदा होणार आहे. परंतु या कामाकडे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी १० वर्षांपासून कालव्याचे काम रखडले आहे. सध्या हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सहभागी करण्यात आल्याने कामाला गती मिळाली आहे. टेंडर प्रक्रिया सुरू असून सर्व व्यवस्थित राहिल्यास तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
४२ टक्के पदे रिक्तसिंचन प्रकल्प रखडण्यासाठी अधिकाऱ्यांना दोषी धरले जाते. परंतु त्यांच्या अडचणींकडे मात्र सहसा लक्ष दिले जात नाही. विदर्भ पाटबंधारे विभागाकडे सध्या ४२ टक्के पदे रिक्त आहे. अशा परिस्थितीत शासनाने कितीही गांभीर्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी ओतला तर कमी मनुष्यबळात काम कसे होणार हा मुख्य प्रश्न आहे.