कोंढाळी : मान्सून राज्यात दाखल झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामाकरिता हमीभावाची घोषणा न केल्याने कोणत्या पिकांची पेरणी करावी याचे नियोजन करण्यास शेतकरी संभ्रमात सापडला आहे. त्यामुळे खरीप हंगामाकरिता पिकांचे हमीभाव सरकारने तातडीने जाहीर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
काटोल तालुक्यात शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीकरिता तयारी करीत आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. यंदा लॉकडाऊन, पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने ट्रॅक्टर भाडे, मजुरी तसेच सोयाबीनचे बियाणे आदी सर्वच खर्चात गत वर्षीच्या तुलनेत यंदा ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला असल्याने केंद्र शासनाने खरीप हंगामाच्या पिकाकरिता हमीभावाची घोषणा करताना वाढ करावी, अशी शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा आहे. बहुतांश शेतकऱ्यांकरिता ‘हमीभाव’ हा जिव्हाळ्याचा विषय आहे. सरकारने हमीभावांची घोषणा करताना हमीभावापेक्षा कमी दरात शेतकऱ्यांचा माल कुणीही खरेदी करणार नाही, असा आदेशही घ्यावा, अशीही मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लावलेल्या लॉकडाऊनचा शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे. त्यामुळे हमीभाव जाहीर होताना गत दीड वर्षात शेतकऱ्यावर ओढावलेल्या संकटाचाही विचार होणे आवश्यक आहे. यासोबतच व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट होणार नाही, याची दक्षताही घेण्यात यावी, अशी मागणी खापरी (बारोकर) येथील शेतकरी सतीश चव्हाण यांनी केली आहे.