नागपूर - राज्यातील बिगर आदिवासींवर होणारा अन्याय कधी संपणार असा सवाल शिवसेना आमदार रुपेश म्हात्रे यांनी सरकारला विचारला आहे. तसेच राज्य सरकारने बिगर आदिवासींवरील अन्याय त्वरीत दूर करावा, या मागणीसाठी आमदार रुपेश म्हात्रेंसह शिवसेनेचे भरत गोगावले, रमेश लटके, प्रकाश भोईर, उज्ज्वल पाटील यांनी आज विधानभवन परिसरात आंदोलन केले.
२०१४ मध्ये राज्यपालांनी काढलेल्या अनुसूचित क्षेत्रातील १०० टक्के आदिवासी आरक्षणाच्या तुघलकी अध्यादेशाला ४ वर्षे पूर्ण झाले. मात्र, अद्यापही कोणताच तोडगा काढण्यात आलेला नाही. अनुसूचित क्षेत्रात २० टक्के जागा आदिवासींसाठी आरक्षित करून ८० टक्के जागा नियमित आरक्षणानुसार भरण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. पण, अद्याप त्याची अंमलबजावणीच झालेली नाही. तर ५० टक्क्यांपेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या असलेल्या अनुसूचित क्षेत्रात 'पेसा कायदा' लागू न करण्याचा ठराव संमत केला. पण, बिगर आदिवासींवरील अन्याय दूर झाला नाही, असे आमदार म्हात्रे यांनी म्हटले आहे.