दीड वर्षापासून बंद : ‘आयआरसीटीसी’कडून दखल नाही
नागपूर : गरीब प्रवाशांना स्वस्त दरात भोजन पुरविणारे रेल्वेस्थानकावरील जनाहार हे रेस्टॉरंट मागील दीड वर्षांपासून बंद आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना रेल्वेगाड्या आणि प्रवासी वाढत आहेत. त्यामुळे जनाहार कधी सुरू होणार, असा प्रश्न गरीब प्रवासी उपस्थित करीत आहेत.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक एकवर जनाहार हे रेस्टॉरंट आहे. येथे गरीब प्रवाशांना स्वस्त दरात भोजन पुरविण्यात येते. २० रुपयांच्या पुरी-भाजीत एका प्रवाशाचे भोजन होते. तर डाळ, चपाती, भाजी आणि लोणचे ही थालीही स्वस्त दरात प्रवाशांना मिळते. परंतु कोरोनाची पहिली लाट येण्यापूर्वीच जनाहार बंद करण्यात आले. पूर्वी रेल्वे प्रशासनाच्या वतीने बेस किचन चालविण्यात येत होते. परंतु त्यानंतर बेस किचनचा ताबा इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम काॅर्पोरेशनने (आयआरसीटीसी) घेतला. तेव्हापासून जनाहार बंद आहे. दीड वर्ष लोटूनही जनाहार सुरू करण्याबाबत पाऊल उचलण्यात आले नाही. सध्या रेल्वेगाड्यांची संख्या वाढत आहे. प्रवाशांची संख्याही पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. परंतु गरीब प्रवाशांना स्वस्त दरात भोजन देणाऱ्या जनाहार सुरू करण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आयआरसीटीसीने जनाहार सुरू करून गरीब प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
............
नूतनीकरणाचे काम सुरू
‘जनाहारच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिने वेळ लागणार आहे. त्यानंतर जनाहार प्रवाशांसाठी नियमित सुरू करण्यात येईल.’
- गुरुराज सोना, क्षेत्रीय व्यवस्थापक, आयआरसीटीसी
.........