लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आयआयटी’सह देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या ‘जेईई-मेन्स’चा पहिला टप्पा आटोपला आहे. परंतु असे असतानादेखील वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट’चे वेळापत्रकदेखील जाहीर झालेले नाही. ‘कोरोना’मुळे बहुतांश शिक्षण ‘ऑनलाईन’च झाले असताना ‘जेईई-मेन्स’प्रमाणे वर्षातून एकाहून अधिक वेळा परीक्षा घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरवर्षी उपराजधानीसह विदर्भातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ‘नीट’ची परीक्षा देतात. दहावीनंतर लगेच अभ्यासालादेखील सुरुवात होते व दोन वर्षे ते त्यात झोकून देतात. मात्र ‘कोरोना’मुळे विद्यार्थ्यांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. एखाद्या कारणाने परीक्षेच्या वेळी अडचण आली तर त्याचा परिणाम निकालावर होतो. त्यामुळे वर्षातून एकाहून जास्त संधी देण्यावर सरकारने गंभीरतेने विचार करावा, अशी मागणी होत आहे.
बारावीचे वेळापत्रक जारी झाले आहे. ‘जेईई-मेन्स’चा पहिला टप्पा आटोपला आहे. विद्यार्थ्यांना आणखी तीन प्रयत्न देता येणार आहे. असे असताना ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’तर्फे ‘नीट’चे साधे वेळापत्रक व परीक्षेचे माध्यमदेखील जाहीर का झाले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘ऑनलाईन’ परीक्षा का नाहीत ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘नीट’च्या परीक्षा ‘ऑफलाईन’ माध्यमातूनच घेण्यावर केंद्राकडून विचार सुरू आहे. ‘कोरोना’मुळे बहुतांश विद्यापीठांचा परीक्षा ‘ऑनलाईन’ झाल्या. असे असताना ‘नीट’ला वेगळा न्याय नको असा सूरदेखील उमटत आहे.
आर्थिक भुर्दंडाची चिंता
अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी लाखो रुपये खर्च करुन विद्यार्थ्यांना ‘कोचिंग क्लास’मध्ये टाकले. मात्र एकच संधी असल्यामुळे जर एखाद्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा नीट गेली नाही तर त्यांना परत वर्षभराची प्रतीक्षा करावी लागेल. यात मनस्तापासह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. त्यामुळे एकाहून अधिक प्रयत्नांची मुभा द्यायला हवी, असे विद्यार्थ्यांचे मत आहे.