लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : पावसाळ्यापूर्वी नाले व सांडपाण्याच्या नाल्यांची मान्सूनपूर्व साफसफाई करणे आवश्यक असताना काेंढाळी ग्रामपंचायत प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. गावातून वाहणाऱ्या लेंडी नाल्यात तुंबलेल्या घाण पाण्यामुळे तिथे डुकरांचा वावर वाढला आहे. त्यातच नाल्याला पूर आल्यास पुरासाेबत नाल्यातील घाण पाणी काठच्या घरांमध्ये शिरण्याची व त्यातून नागरिकांचे आराेग्य धाेक्यात येण्याची शक्यता बळावली आहे.
कोंढाळी (ता. काटाेल) गावाच्या मध्य भागातून वाहणाऱ्या लेंडी नाल्याच्या काठी उमाठेनगर, कुंभारपुरा, लेंडीपुरा, भोईपुरा या जुन्या वस्त्या आहेत. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी भूमिगत नाल्या तयार केल्या आहेत. त्या नाल्यांमधील पाणी लेंडी नाल्यात साेडले आहे. त्यामुळे हिवाळ्यापासून या नाल्यात सांडपाण्याचे डबके तयार हाेते. नाल्यात घाण तयार झाल्याने तिथे डुकरांचा वावर व डासांची पैदास वाढली आहे.
पावसाळ्यात पुराचा संभाव्य धाेका कमी करण्यासाठी या नाल्याची साफसफाई करणे आवश्यक आहे. मात्र, मागील काही वर्षापासून ग्रामपंचायत प्रशासनाने या नाल्याची साफसफाई केली नाही. डुकरांमुळे नाल्यातील घाण लगतच्या वस्त्यांमध्ये पसरत असून, डासांमुळे मलेरिया, डेंग्यू व कीटकजन्य आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाल्याला पूर आल्यास ही घाण नागरिकांच्या घरात शिरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या नाल्याची तातडीने साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
...
नाली उंच अन् रस्ता सखल
काेंढाळी येथील काही भागात सांडपाण्याच्या नाल्यांचे बांधकामही सदाेष करण्यात आले. बसस्थानक परिसरात बाेडे यांच्या घरासमाेर नाली उंच असून, रस्ता सखल आहे. गावातील बहुतांश नाल्यांमधून सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा हाेत नाही. त्यातच नाल्यांची नियमित साफसफाई देखील केली जात नाही. रामनगरात प्रल्हाद बालपांडे यांच्या घरामागे नाली मंजूर करण्यात आली. परंतु, कामाला सुरुवातच करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्या घरामागे दलदल तयार झाली असून, परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.