लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : नागपूर-काटाेल-वरुड-अमरावती हा राज्य मार्ग कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातून गेला आहे. या मार्गालगत शहरातील बाजारपेठा व शासकीय कार्यालये आहेत. शिवाय, त्याला अन्य तीन मार्ग जाेडले आहेत. या मार्गावरील ट्रॅफिक अस्ताव्यस्त असून, वाहनांचा वेग अनियंत्रित असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या मार्गाचे रुंदीकरण करून त्यावर दुभाजकाची निर्मित करणे गरजेचे असल्याने या बाबींची निर्मिती करणार कधी, असा प्रश्न शहरवासीयांनी उपस्थित केला आहे.
हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून, याला कळमेश्वर-गाेंडखैरी, कळमेश्वर-सावनेर व कळमेश्वर-माेहपा हे तीन महत्त्वाचे मार्ग जाेडले. कळमेश्वर-गाेंडखैरी मार्ग हा नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ ला तर कळमेश्वर-सावनेर मार्ग नागपूर-भाेपाळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४७ ला जाेडला आहे. कळमेश्वर शहरालगत औद्याेगिक वसाहत असल्याने या दाेन्ही महामार्गावरील जड व हलकी वाहने शहरात येतात. त्यामुळे शहरातील मुख्य मार्गावर वाहनांची संख्या वाढते.
यातील बहुतांश वाहनांचा वेग अनियंत्रित राहत असल्याने तसेच दुभाजकाअभावी चालक त्यांची वाहने अस्ताव्यस्त चालवित असल्याने त्यांची ही बाब अपघातांच्या पथ्यावर पडते. ही समस्या साेडविण्यासाठी या मार्गाचे रुंदीकरण करून त्यावर दुभाजकाची निर्मिती करणे अत्यावश्यक असल्याचे मत जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले आहे.
---
विद्यार्थ्यांसह नागरिकांचा वावर
या मार्गालगत शहरातील काही शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, पाेलीस ठाणे, नगर परिषद, पंचायत समिती, तहसील, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमिअभिलेख यासह अन्य कार्यालये, ग्रामीण रुग्णालयासह खासगी हाॅस्पिटल, राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा, हुडकाे काॅलनी, नवजीवन काॅलनी, शिक्षक काॅलनीसह अन्य नागरी वस्त्या असल्याने या मुख्य मार्गावर राेज नागरिकांसह विद्यार्थ्यांचा वावर असताे. त्यामुळे वाहतूक नियंत्रित करण्यासाठी दुभाजकाची आवश्यकता आहे.
---
शहरातील ब्राह्मणी फाटा ते मटण मार्केट दरम्यानच्या मुख्य मार्गाचे रुंदीकरण करून त्यावर दुभाजक तयार करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ‘इस्टिमेट’ तयार केले आहे. यासाठी अंदाजे सात काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी उपलब्ध करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे.
- स्मिता काळे, मुख्याधिकारी,
नगर परिषद, कळमेश्वर.