सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील नागरिकांना स्वत:ची महत्त्वपूर्ण कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी व्यक्तिगत इलेक्ट्रॉनिक लॉकर म्हणजे ‘डीजी लॉकर’ उपलब्ध करून दिले आहे. या तंत्रज्ञानामुळे शासकीय कामकाजात लागणारी सर्व महत्त्वाची कादगपत्रे साठविता येतात. ही कागदपत्रे आधार कार्ड क्रमांकाना जोडण्याची सुविधाही उपलब्ध आहे; असे असताना मुंबई, पुणेच्या तुलनेत डीजी लॉकर नोंदणीसाठी नागपूर मागे पडले आहे. गेल्या दोन वर्षात केवळ १८ हजार नागरिकांनी याची नोंदणी केली आहे. यामुळे नागपूरकर कधी डिजिटल होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.नागपूर मेट्रो सिटीच्या रांगेत उभे आहे. ‘स्मार्ट’ सिटीकडे वाटचाल सुरू आहे. मात्र, नागपूरकर स्वत: डिजिटल होण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने नागरिकांसाठी ‘डीजी लॉकर’सेवा उपलब्ध करून दिली. यात मोटार वाहन परवाना, आरसी बुकच नाही तर पॅन कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे आणि आता वाहनाचा विमाही साठविता येतो. ‘डीजी लॉकर’ हे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाशी जोडले गेले आहे तसेच अॅपवरील कागदपत्रे ग्राह्य धरली जावीत, अशा सूचना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाने दिल्या आहेत. त्याचप्रमाणे वाहतूक पोलिसांना अॅपवरील कागदपत्रांची तपासणी करायची असेल तर तेथे ‘क्यूआर कोड’ची सुविधा आहे. त्या कोडचा वापर करून वाहतूक पोलिसांना किंवा आरटीओ निरीक्षकांना वाहन चालकाचे नाव, पत्ता, मोबाईल, क्रमांक, जन्मतारीख, वाहन क्रमांक, इंजिन क्रमांक, चेसीस क्रमांक आदी बाबींची सत्यता पडताळता येते. डीजी लॉकरमध्ये साठविलेल्या कागदपत्रांची लिंक हव्या त्या ई-मेलवर सहजपणे पाठविण्याची सुविधाही आहे. शिवाय काही शासकीय कार्यालयांमध्ये कागदपत्रांच्या छापील प्रतिऐवजी डीजी लॉकरमधील कागदपत्राची डिजिटल प्रत स्वीकारण्याची सुविधाही आहे.मात्र पुणे, मुंबईच्या तुलनेत ५० टक्केही नागपूरकरांनी याची नोंदणी केलेली नाही.
हे आहेत फायदे
- ‘डीजी लॉकर’ तंत्रज्ञानामुळे वाहन परवाना, आरसी बुक व इन्शुरन्स वाहन चालकांनी सोबत बाळगण्याची गरज नाही.
- रेल्वे प्रवासात ओळखपत्र पुरावा म्हणून ‘डीजी लॉकर’मधील ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते.
- बँकेत खाते उघडताना, गॅसचे कनेक्शन घेताना ‘डीजी लॉकर’ची मदत घेता येते.
डीजी लॉकरमध्ये साठविलेल्या कागदपत्रांची लिंक हव्या त्या ई-मेलवर सहजपणे पाठविता येते.
महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
‘डीजी लॉकर’ची सर्वाधिक नोंदणी देशात तामिळनाडू येथे झाली आहे. ४६ लाख ६६ हजार ९८ लोकांनी याची नोंदणी करून प्रथम स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेश आहे. येथील ४२ लाख ८ हजार ४५७ लोकांनी नोंदणी केली आहे तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. ४२ लाख १ हजार १८ लोकांनी याची नोंदणी केली आहे. सर्वात कमी नोंदणी नवी दिल्ली येथे झाली आहे. १४ लाख १ हजार १८९ लोकांनीच नोंदणी केली आहे.
राज्यात मुंबईत सर्वाधिक नोंदणीराज्यात सर्वाधिक मुंबईमधील ६५ हजार ५४ लोकांनी ‘डीजी लॉकर’साठी नोंदणी केली आहे. त्यानंतर पुण्यातील ६१ हजार ९५२ तर ठाण्यात ५७ हजार ८५१ लोकांनी नोंदणी केली आहे. नागपुरात केवळ १८ हजार ५५८ लोकांनीच याची नोंदणी केली आहे.
डीजी लॉकर म्हणजे काय?वाहन परवाना, आरसी बुक, आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे किंवा अन्य महत्त्वाची कागदपत्रे साठविण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली सुविधा म्हणजे ‘डीजी लॉकर’. ‘डीजी लॉकर’ हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे आवश्यक आहे. त्यामुळे मोबाईलच्या एका क्लिकवर ही कागदपत्रे आपल्याला पाहिजे त्यावेळी उपलब्ध होऊ शकतात. या अॅपवरील कागदपत्रे ग्राह्य धरली जावीत अशा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सूचना आहेत.