नागपूर : रेल्वे प्रशासनाने नागपूर-मडगाव फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाडी सुरू केली. या गाडीचा कालावधी संपल्यानंतर या गाडीला ३० जानेवारीपर्यंत वाढविण्यात आले आहे. परंतु कोकण, मुंबई आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी महत्त्वाची असल्यामुळे ही गाडी नियमित करण्याची गरज आहे.
रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाडी क्रमांक ०१२३६/०१२३५ नागपूर-मडगाव-नागपूर फेस्टिव्हल एक्स्प्रेस सुरू केली. मागील तीन वर्षांपासून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांकडून ही गाडी सुरू करण्याची सातत्याने मागणी होत आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने फेस्टिव्हल स्पेशल म्हणून नागपूर-मडगाव या गाडीची घोषणा केली. सुरुवातीला एक महिना ही गाडी चालविल्यानंतर पुन्हा या गाडीला मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१२३५ नागपूर -मडगाव ही गाडी ८ जानेवारी ते २९ जानेवारीपर्यंत धावणार आहे. तर रेल्वेगाडी क्रमांक ०१२३६ मडगाव-नागपूर फेस्टिव्हल स्पेशल ही गाडी ९ ते ३० जानेवारी दरम्यान धावणार आहे. या दोन्ही गाड्या मुंबईतील कल्याण, कोकणातील रत्नागिरी या मार्गाने गोव्याला जातात. त्यामुळे मुंबई, कोकण आणि गोवा या तीनही ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी या गाड्या सोयीच्या आहेत. परंतु रेल्वे प्रशासनाने केवळ महिनाभराची मुदतवाढ दिल्यामुळे ही गाडी पुन्हा बंद तर होणार नाही ना, अशी भीती प्रवाशांना वाटत आहे. विदर्भातून गोवा, कोकण आणि मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या १२ महिने फुल्ल असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन नागपूर-मडगाव-नागपूर ही गाडी नियमित करण्याची गरज आहे.
............
नागपूर-मडगाव नियमित करून दररोज चालवावी
‘कोरोनामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. प्रवासी महत्त्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे नागपूर-मडगाव फेस्टिव्हल स्पेशलला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही गाडी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेऊ शकते. परंतु मुंबई, कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी सोयीस्कर आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नागपूर-मडगाव-नागपूर ही गाडी नियमित करून दररोज चालविण्याची गरज आहे.’
-बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र
..............