नागपूर : कोरोनामुळे नियमित रेल्वेगाड्या रेल्वे प्रशासनाने बंद केल्या. त्या ऐवजी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. पॅसेंजर रेल्वेगाड्याही बंद असल्यामुळे तसेच नागपुरातून सुटणाऱ्या महत्वाच्या रेल्वेगाड्या अद्याप सुरू न झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना रेल्वे प्रशासनाने नियमित रेल्वेगाड्या सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
सध्या सुरु असलेल्या महत्वाच्या रेल्वेगाड्या
अ) ०२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस
ब) ०२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस
क) ०२२८० हावडा-पुणे एक्स्प्रेस
ड) ०२७२२ निजामुद्दीन-हैदराबाद एक्स्प्रेस
ई) ०८२३६ हजरत निजामुद्दीन-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस
फ) ०८२४४ भगत की कोठी-बिलासपूर एक्स्प्रेस
या गाड्या कधी सुरू होणार ?
अ) ०२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस
ब) ०२११४ नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेस
क) ०२२२४ अजनी-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस
ड) ०२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस
ई) ०२१५९ नागपूर-जबलपूर एक्स्प्रेस
पॅसेंजर गाड्यांचा अद्याप निर्णय नाही
प्रवाशांच्या दृष्टीने पॅसेंजर रेल्वेगाड्या महत्वाच्या आहेत. या गाड्यांमध्ये प्रवाशांना कमी तिकीट देऊन प्रवास करणे शक्य होते. परंतु मागील दीड वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने कोरोनामुळे पॅसेंजर गाड्या बंद केलेल्या आहेत. त्या ऐवजी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत आहे. परंतु सध्या पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार नाही. रेल्वे बोर्डाने सूचना केल्यानंतर पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यात येतील, असे अधिकारी सांगत आहेत.
पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात
‘पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेष रेल्वेगाड्यात प्रवाशांना अधिक रक्कम मोजून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरु करण्याची गरज आहे.’
-वसंत काळे, प्रवासी
पुण्यासाठी रेल्वेगाड्या सुरू कराव्यात
‘नागपूर तसेच विदर्भातून अनेक विद्यार्थी आणि नोकरदार पुण्याला ये-जा करतात. परंतु पुण्यासाठी असलेल्या नागपूर-पुणे एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस आणि अजनी-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्या सुरू करण्याची गरज आहे.’
-ब्रिजेश्वर ठाकूर, प्रवासी
............