लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : मागील ३३ वर्षांपासून सुरू असलेली नागपूर-वग-पारडी ही हाॅल्टिंग (मुक्कामी) बससेवा काेराेना संक्रमणामुळे दीड वर्षापासून बंद आहे. हल्ली एसटी महामंडळाने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. मात्र, ही बससेवा अद्यापही सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे गैरसाेय हाेत असल्याने ही बससेवा कधी सुरू करणार, असा प्रश्नही या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पारडी, पचखेडी व परिसरातील गावांमधील नागरिकांना व्यापारीदृष्टीने नागपूर व उमरेड शहरांशी थेट संबंध येताे. नागपूर-वग-पारडी ही बससेवा त्यादृष्टीने सर्वांसाठी साेयीची व महत्त्वाची हाेती. काेराेना संक्रमणामुळे ही बससेवा तसेच नॅराेगेजचे ब्राॅडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूकही बंद असल्याने या भागातील नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ही बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी पारडी ग्रामपंचायत प्रशासनासाेबतच स्थानिक व परिसरातील गावांमधील नागरिकांनी आ. राजू पारवे व एसटी महामंडळाच्या नागपूर येथील आगार प्रमुखांना निवेदने दिली. यासाठी त्यांनी पत्रव्यवहारही केला. मात्र, ही मागणी गांभीर्याने घेतली नाही, असा आराेप त्यांनी केला आहे.
शेतकरी, नागरिक व विद्यार्थ्यांची हाेणारी गैरसाेय दूर करण्यासाठी नागपूर-वग-पारडी ही मुक्कामी बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी पारडीच्या सरपंच देवांगना रंगारी, वगच्या सरपंच सुनीता निंबर्ते, उपसरपंच नरेश शुक्ला, सुनील खवास, राजेश्वर पोटे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
...
रेल्वे वाहतूकही बंद
नागपूर जिल्ह्याच्या टाेकावर असलेल्या कुही तालुक्यातील पारडी गटग्रामपंचायतअंतर्गत पारडी व पचखेडी या दाेन गावांचा समावेश करण्यात आला आहे. पचखेडीपासून जवळच असलेले बाम्हणी हे गाव नागपूर-नागभीड या रेल्वेमार्गावर आहे. येथील नॅराेगेज रेल्वेलाईनचे ब्राॅडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद आहे.
...
भाजीपाला, दूध विकण्यास अडचणी
या भागातील शेतकरी भाजीपाल्याच्या उत्पादनासाेबतच माेठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय करतात. ते दूध व भाजीपाला विक्रीसाठी नागपूर व उमरेड शहरात नेतात. या भागात दळणवळणाची सार्वजनिक व खासगी साधने नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल व दूध नागपूर व उमरेड शहरात विकायला येण्यास अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे.