नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात बेळगाव कारागृहातून धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी ऊर्फ शाकीर याच्याविरोधात ‘एनआयए’ने गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप त्याचा ताबा ‘एनआयए’कडून घेण्यात आलेला नाही. दहशतवादी संघटनांसोबत त्याची ‘लिंक’ आढळल्यानंतर त्याची कसून चौकशी होणे अपेक्षित आहे. त्याचा ताबा कधी घेण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एनआयए’चे पोलिस उपमहानिरीक्षक गुरुवारी नागपुरात येणार आहेत.
नितीन गडकरींना बेळगाव कारागृहातून धमकीचे फोन केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस जयेशला नागपुरात आणण्यात आले व चौकशीतून धक्कादायक खुलासे होण्यास सुरुवात झाली. त्याची लष्कर-ए-तोएबा, पीएफए या संघटनांच्या सदस्यांशी ‘लिंक’ समोर आली. त्यानंतर त्याच्यावर ‘यूएपीए’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना जिवे मारण्याची सुपारी घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. लष्कर-ए-तोयबा आणि पीएफआय या दहशतवादी संघटनांनी त्याला ईश्वरप्पांची सुपारी दिली होती. मात्र, त्याअगोदरच तो या प्रकरणात अडकला. जयेशने त्याच्या एका साथीदाराला कारागृहातून बाहेर काढून शस्त्रांसाठी पैसेही उपलब्ध करून दिले होते.
या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद दिल्लीतदेखील उमटले व ‘एनआयए’ने याची चौकशी करावी, असा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविण्यात आला. गृह मंत्रालयाने याचा तपास ‘एनआयए’कडे सोपविला. एनआयएच्या पथकाने येऊन त्याची चौकशीदेखील केली. मात्र अद्यापही त्याचा ताबा घेण्यात आलेला नाही. ‘एनआयए’चे मुंबईतील उपमहानिरीक्षक राहुल खराटे किंवा ज्योतीप्रिया सिंह यांच्यापैकी एक अधिकारी गुरुवारी नागपुरात येणार आहेत. यावेळी ते नागपूर पोलिसांनी आतापर्यंत केलेला तपास व सोबतच बंगळुरू, मंगळुरूतून त्याच्या सहकाऱ्यांच्या घेतलेल्या जबानीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. ते तपास पथकासह नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेटदेखील घेऊ शकतात. त्यांच्या भेटीदरम्यान जयेशचा ताबा घेण्याबाबतची प्रक्रिया सुरू होऊ शकते. याबाबतचे चित्र गुरुवारनंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.