नागपूर : कोरोनामुळे शासनाने निर्बंध लावल्यामुळे राज्यातील रातराणी बसेस अत्यल्प प्रमाणात सुरू आहेत. परंतु इतर राज्यात बंदीच असल्यामुळे त्या राज्यातील रातराणी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असून, रातराणी बसेस त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे.
-सध्या सुरू असलेल्या राज्यांतर्गत रातराणी
१) नागपूर-पंढरपूर
२) नागपूर-नाशिक
३) नागपूर-सोलापूर
केवळ तीनच रातराणी
नागपूरवरून केवळ तीनच रातराणी बसेस सुरू आहेत. कोरोनापूर्वी जवळपास १५ ते २० रातराणी बसेस धावत होत्या. परंतु प्रवासी अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करीत असल्यामुळे ते प्रवास टाळत आहेत. शासनाने घातलेले निर्बंध शिथिल झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे रातराणी बसेस सुरू होतील, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
२) परराज्यात जाणाऱ्या रातराणी बंदच
१) नागपूर-मध्य प्रदेश
२) नागपूर-हैदराबाद
३) नागपूर-रायपूर
४) नागपूर-पचमढी
रातराणी सुरू नसल्यामुळे गैरसोय
‘रातराणी बसेस सुरू नसल्यामुळे गैरसोय होत आहे. मध्य प्रदेश शासनाने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसवर निर्बंध लावल्यामुळे या बसेस बंद आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून आपल्या मूळ गावी जाऊ शकलो नाही.’
-बसंत तिवारी, प्रवासी
रातराणीमुळे होतात महत्त्वाची कामे
‘मी रातराणी बसने मध्य प्रदेशातील आपल्या गावाला जात असतो. रात्रभर प्रवास करून सकाळीच आपल्या गावात पोहोचल्यानंतर दिवसा महत्त्वाची कामे आटोपता येतात. त्यानंतर पुन्हा रातराणीने प्रवास करून दुसऱ्या दिवशी आपल्या कामावर जाता येते. परंतु आता रातराणी बसच बंद असल्यामुळे गैरसोय होत आहे.’
-कमल यादव, प्रवासी
निर्बंध शिथिल होताच रातराणी सुरू करणार
‘दुपारी ४ वाजेपर्यंत बाजारपेठा सुरू असल्यामुळे रात्रीचा प्रवास करण्याकडे प्रवाशांचा कल नाही. तसेच इतर राज्यांतील निर्बंध शिथिल झाल्यानंतर परराज्यातील रातराणी बसेस सुरू करण्यात येतील.’
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
.............