लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कोरोनाची एकूण स्थिती लक्षात घेता परीक्षा शुल्क माफ करण्यासंदर्भात पावले उचलली आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीने व्यवस्थापन परिषदेकडे अहवाल पाठविला आहे. समितीच्या शिफारशीनुसार २०२१ मध्ये विद्यार्थ्यांना केवळ २५ टक्के परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. यासंदर्भातील अधिकृत निर्णय कधी घोषित होणार असा सवाल विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
विद्यापीठातील परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे अशी मागणी विविध प्राधिकरण सदस्यांनी लावून धरली होती. त्यावर व्यवस्थापन परिषदेत चर्चा झाली होती व शुल्कमाफीचे नेमके सूत्र ठरविण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना हिवाळी परीक्षेसाठी २५ टक्के परीक्षा शुल्क भरावे लागेल. उर्वरित शुल्क विद्यापीठ माफ करणार आहे. सोबतच महाविद्यालयांमार्फत आकारण्यात येणारे जीम, कॉलेज मॅगझिन, प्रोजेक्ट फी, युथ फेस्टिवल शुल्क माफ करण्यात येणार आहे. महाविद्यालयांना ३९० रुपये प्रति विद्यार्थी यानुसार शुल्क विद्यापीठांना द्यावे लागते. हे शुल्कही माफ करण्यात येणार आहे. लायब्ररी आणि प्रॅक्टिकलसाठी विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क भरावे लागणार आहे.
व्यवस्थापन परिषदेकडून या समितीच्या अहवालाला हिरवी झेंडी दाखविण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या हिताचा मुद्दा असल्याने प्रशासनाने तातडीने ही बैठक बोलवावी व अधिकृत निर्णय घोषित करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
अभाविपचा इशारा
दरम्यान, शुल्कमाफीचे परिपत्रक त्वरित काढण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे देण्यात आला आहे. शासनाने शुल्कमाफीसंदर्भात पत्रक काढल्यावरदेखील विद्यापीठाने अद्याप परिपत्रक जारी केलेले नाही. वारंवार विनंती करूनदेखील प्रशासनातर्फे लेटलतिफी करण्यात येत आहे. लवकरात लवकर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली. यावेळी नागपूर महानगर मंत्री करण खंडाळे, अखिलेश भारतीय, माधुरी कुर्जेकर, अमित पटले, प्रियंका वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते.