रामटेक : राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या रामटेक येथील उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत धान खरेदी योजनेंतर्गत तालुक्यामध्ये पवनी, भंडारबोडी, बांधल्या व टुयापार येथे एकूण चार खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. या चारही केंद्रावर अतिशय संथ गतीने शेतकऱ्यांचा धान खरेदी केला जात असल्याने या भागातील शेतकऱ्यांची पंचाईत झालेली आहे. यासोबत तालुक्यातील भोंदेवाडा आणि हिवराबाजार येथील केंद्र सुरू झाले नसल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना धानाची विक्री कुठे करावी असा प्रश्न पडला आहे.
रामटेक तालुक्यातील एकूण १५१ गावांपैकी सुमारे १०० गावे ही आदिवासी संवर्गात मोडतात. या गावात आदिवासी शेतकरी अधिक आहेत. या शेतकऱ्या सोबतच या भागातील बिगर आदिवासी शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयावर सोपविण्यात आली आहे. मात्र महामंडळ याबाबतीत अतिशय उदासीन असते. यंदा तालुक्यात पवनी येथे ९ डिसेंबर रोजी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतर ४ जानेवारीला महादुला,बांद्रा व टुयापार येथील धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. याबाबत माहिती देताना उपप्रादेशिक व्यवस्थापक म्हणाले, आदिवासी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून ही खरेदी केंद्र चालविली जातात. मात्र या भागातील सुमारे ११ आदिवासी सेवा सहकारी संस्थांसाठी एकच गटसचिव असल्याने आधारभूत खरेदी योजनेंतर्गत केंद्र लवकर सुरू करता आले नाही. पाठपुरावा केल्यानंतर दोन सहायक गटसचिवांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यानंतर ४ जानेवारीला तीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. आतापर्यंत आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून उपरोक्त चारही केंद्रावर एकूण १८१ शेतकऱ्यांचा ५ हजार ७७० क्विंटल धान खरेदी करण्यात आला. यापैकी ८४ शेतकऱ्यांना चुकारे देण्यात आले आहेत. हिवरा बाजार व भोंदेवाडा अशी दोन खरेदी केंद्र उपप्रादेशिक कार्यालय रामटेकच्यावतीने प्रस्तावित करण्यात आलेली आहे. मात्र या दोन्ही खरेदी केंद्रांना अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या केंद्राशी जोडण्यात आलेल्या गावातील शेतकऱ्यांना धान कुठे विकावा, असा प्रश्न पडला आहे. महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या चारही केंद्रावर त्यांचा धान खरेदी केल्या जात नाही. हिवरा बाजार व भोंदेवाडा ही दोन खरेदी केंद्र सुरु होईपर्यंत या भागातील शेतकरी यांना उपरोक्त चारही केंद्रावर कुठेही धान विकण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
---
रामटेक तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रशासकीय उदासीनतेचा फटका बसतो आहे. धान उत्पादक शेतकरी अडचणीत असताना उत्पादित केलेला माल विकण्यासाठी सरकार पर्याप्त सुविधा उपलब्ध करून देत नाही याशिवाय दुसरी शोकांतिका काय?
- डॉ.राजेश ठाकरे, जिल्हाध्यक्ष, ग्राम विकास आघाडी, भाजपा.