संघटनेचे आयुक्तांना स्मरणपत्र : मनपातील निवृत्तावर अन्याय का
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारच्या आदेशानुसार नागपूर महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र निवृत्ती वेतनधारकांना अद्याप सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. निवृत्तावर होणारा अन्याय दूर करून सातवा वेतन आयोग कधी लागणार, असा प्रश्न निवृत्तीधारकांना पडला आहे.
वास्तविक कर्मचारी व शिक्षकांसोबतच निवृत्तानाही सातवा वेतन आयोग लागू होईल. अशी अपेक्षा होती. मात्र यातून निवृत्तीधारकांना वगळले आहे. ज्या-ज्या महापालिकांनी सातवा वेतन आयोग लागू केलाा त्यांनी निवृत्तीधारकांनाही सातवा वेतन आयोग लागू केला आहे. सर्व निवृत्तीधारक हे मंजूर पदावरून निवृत्त झालेले असल्याने त्यांना तात्काळ सातवा वेतन आयोग लागू करावा, अशा आशयाचे स्मरणपत्र राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, कार्याध्यक्ष विलास चहांदे, जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे व कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे आदींनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना दिले आहे.
शिक्षक व कर्मचाऱ्यांसोबत प्रत्येक वेळी निवृत्तीवेतनधारकांना वेतन आयोग लागू झालेला आहे. यासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात आलेले नाही. राज्य सरकारने सातवा वेतन आयोग जानेवारी २०१६ पासून लागू केला आहे. त्यामुळे जे कर्मचारी जानेवारी २०१६ नंतर निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या निवृत्ती वेतनात सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन निश्चित करण्यात यावे. अशी मागणी संघटनेने केली आहे.