कायम विनाअनुदानित महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात घरी बसून धरणे प्रदर्शन दिल्यानंतर ३ जुलै २०२० रोजी डॉ. दीपक धोटे यांनी वेबिनारद्वारे आमदार, शिक्षक आमदार, पदवीधर आमदारांची बैठक घेतली होती. नंतर या आमदारांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आपले प्रश्न मांडले व त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी बैठक घेऊन हा प्रश्न एक महिन्यात सोडविण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले. त्यामुळे, ९० दिवसांपासून सुरू असलेले धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, त्यानंतरही झालेल्या बैठकींतून काहीच साध्य झाले नाही. गेल्या आठ महिन्यांपासून प्रश्न मार्गी लागलेले नाही. दरम्यान अनेक प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाले. मात्र, त्यांना व इतर संक्रमितांना कुठलीही मदत मिळाली नाही. महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमानुसार टप्प्याटप्प्याने २००१नंतरच्या कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान मिळणे अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे २००३ नंतरच्या कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयांचा कायम शब्द काढून अनुदान दिले आणि त्यांचे प्रश्न सोडवले. त्याच आधारावर कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान कधी मिळणार, हा प्रश्न आहे.
- सहा. प्रा. सचिन बन्सोड, नवप्रतिभा वरिष्ठ महाविद्यालय, सक्करदरा, नागपूर
................