रेवराल : वादळामुळे माेहदुरा (ता. माैदा) शिवारातील मिरचीच्या शेतात विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. त्यामुळे एकीकडे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला असून, दुसरीकडे तारांमुळे शेतात कामे करताना अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. या तारा पूर्ववत जाेडून त्या सरळ करण्याची महवितरण कंपनीकडे वारंवार मागणी करण्यात आली. मात्र, कर्मचारी लक्ष देत नाही, असा आराेप या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.
या तारा लक्ष्मण महादुले, रा. माेहदुरा, ता. माैदा यांच्या माेहदुरा शिवारातील शेतात पडून आहेत. शेतात मिरची असल्याने मशागत व मिरची ताेडण्याची कामे करताना अडचणी येत असल्याचे लक्ष्मण महादुले यांनी सांगितले. तारा तुटल्याने या शिवारातील कृषिपंपांचा वीजपुरवठा आठ दिवसांपासून खंडित आहे.
ताे पूर्ववत करण्यासाठी तसेच या तारा जाेडण्यासाठी अराेली (ता. माैदा) येथील पाॅवर सबस्टेशनचे कनिष्ठ अभियंता आगरकर यांना कळविले. त्यावर ‘तुम्हीच ट्रॅक्टर आणा, तुम्हीच खड्डे खाेदा, त्याची मजुरीही तुम्हीच द्या. आम्ही केवळ खांब व तारा पाठविताे’ असे उत्तर दिल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यावर आम्ही जर एवढा खर्च करायचा असेल तर महावितरण कंपनी काेणते काम करेल, असा प्रश्नही या भागातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला. हे सर्व आराेप कनिष्ठ अभियंता आगरकर यांनी फेटाळले असून, दाेन दिवसात या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
....
सिंचन समस्या ऐरणीवर
किडी व राेगाच्या प्रादुर्भावामुळे धानव साेयाबीनचे पीक हातचे गेल्याने या भागातील शेतकऱ्यांनी मिरचीच्या पिकावर लक्ष केंद्रित केले आहे. मिरचीला ओलिताची नितांत गरज आहे. तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे मिरचीला ओलित करणे शक्य हाेत नसल्याने नवीन समस्या ऐरणीवर आली आहे. शिवाय, तारा पडलेल्या परिसरात मिरची ताेडण्यासाठी मजुरांना त्रास हाेत असून, महिला मजूर आत जाण्यास धजावत नसल्याचेही लक्ष्मण महादुले यांनी सांगितले.