११ महिन्यानंतरही स्मार्टकार्डची प्रतीक्षा : कागदाची ‘आरसी’ हाताळणे जिकीरीचेनागपूर : राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि संगणकासारख्या अद्ययावत पद्धतीचा अवलंब केला जात असताना गेल्या ११ महिन्यांपासून वाहनांचे नोंदणीपुस्तक (आरसी बुक) पूर्वीप्रमाणेच कागदावर छापून दिले जात आहे. परिणामी कागदाची ‘आरसी’ हाताळणे वाहनचालकांसाठी अडचणीचे ठरत आहे. नवीन नोंदणी झालेल्या वाहनांना आरटीओ कार्यालयातर्फे पूर्वी आरसी बुक कागदी पुस्तिकेच्या स्वरूपात दिले जात होते. मात्र, ते सांभाळणे खूप जिकरीचे होते. तंत्रज्ञानातील बदल ओळखून परिवहन विभागाने २००६ मध्ये ‘शाँग’ या खासगी कंपनीला आरसी बुक स्मार्ट कार्डच्या स्वरूपात तयार करून देण्याचे कंत्राट दिले. जून २०१४ मध्ये हे कंत्राट संपले. या कंत्राटदाराला दिलेली सहा महिन्यांची मुदतवाढही नोव्हेंबर अखेरीस संपली आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या तारखेपासून नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांना कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील आरसी बुक देणे सुरू झाले. परंतु आरटीओकडे आधीच तोकडे मनुष्यबळ असताना या नव्या कामाची भर पडल्याने दिवसाकाठी सुमारे ३० आरसी बुक कागदी पुस्तिकेच्या स्वरूपात तयार होत आहे. पूर्वी स्मार्ट कार्डच्या स्वरुपात हेच आरसीबुक शंभरावर तयार व्हायची. आरसीची प्रलंबित संख्या वाढून राज्यभरात ५० हजाराच्यावर गेल्याची माहिती आहे. परिणामी राज्यभरातील ५० प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणीधारकांमध्ये संताप आहे.(प्रतिनिधी)हजारावर आरसी प्रलंबितप्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर, ग्रामीण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व मिळून सुमारे हजारावर आरसी प्रलंबित असल्याची माहिती आहे. पूर्वी हे काम ‘शाँग’ कंपनीच्या पंधरावर कर्मचाऱ्यांवर होते, ते आता आरटीओ कार्यालयाच्या दोन-तीन कर्मचाऱ्यांवर आले आहे. यामुळे दिवसाकाठी केवळ ३० आरसी बुक तयार होतात. यामुळे दिवसेंदिवस प्रलंबित आरसीची संख्या वाढत आहे.
कधी होणार आरटीओ ‘स्मार्ट’!
By admin | Published: October 03, 2015 3:09 AM