लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओबीसीसह विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना झाली. नागपुरात मुख्यालय झाले. परंतु औरंगाबाद, नाशिक आणि पुणे येथे होणारे उपकेंद्र मात्र दोन वर्षानंतरही सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे हित सााधणार तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्य शासनाने ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना ८ ऑगस्ट २०१९ ला केली. नागपुरात याचे मुख्यालय स्थापन करण्यात आले. दोन वर्षे झाली परंतु पाहिजे तसे समाधानकारक काम मात्र झाल्याचे दिसून येत नाही. महाज्योतीचे मुख्यालय आहे, पण त्याची स्वतंत्र जागा नाही. सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीत दुसऱ्याच्याच जागेवर मुख्यालयाचे काम सुरू आहे. यातही पूर्णवेळ कर्मचारीसुद्धा नाहीत. राज्यभरातील ओबीसीबांधवांना या संस्थेचा लाभ व्हावा, त्यांना नागपूरपर्यंत यायची गरज पडू नये म्हणून औरंगाबाद, नाशिक आणि पुणे येथे उपकेंद्र सुरू करण्यात येणार होते. परंतु दोन वर्ष झाली, महाज्योतीचे काम याच गतीने सुरू राहिले तर या वर्षीही ते शक्य नाही. या तुलनेत सारथीचे पाच उपकेंद्र सुरूसुद्धा झाले आहेत. बार्टीला तर आधीच स्वतंत्र अद्ययावत इमारत आहे.
बॉक्स
- जागा शोधण्याचे काम सुरू
औरंगाबाद, नाशिक, पुणे येथे महाज्योतीचे उपकेंद्र होणार आहे. सध्या तरी ते सुरू झालेले नाही. जागा शोधण्याचे काम सुरू आहे.
डॉ. बबनराव तायवाडे
संचालक, महाज्योती
बॉक्स
- मुख्यालय नावालाच, संघटनांचा दबावच नाही
दोन वर्षानंतरही स्वत:ची इमारत नाही. पूर्णवेळ कर्मचारी नाही. नियमित बैठका नाही. त्यामुळे महाज्योतीचे नागपुरातील मुख्यालय हे नावालाच आहे. त्यातुलनेत बार्टी आणि सारथीचे काम अधिक जोमाने सुरू आहे. ओबीसी संघटनांचा पाहिजे तसा दबाव नसल्याने महाज्योतीकडे दुर्लक्ष होत आहे.
उमेश कोराम, स्टुडंट राईट्स असोसिएशन