लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बहुप्रतीक्षित जिल्हा रुग्णालय अंतिम टप्प्यात असून उर्वरित कामे ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही बाब लक्षात घेता हे रुग्णालय कधीपासून कार्यान्वित केले जाईल, अशी विचारणा आरोग्य उपसंचालकांना केली व यावर येत्या २ ऑगस्टपर्यंत माहिती सादर करण्यास सांगितले.
मानकापूर येथील शासकीय मनोरुग्णालयाच्या परिसरात पूर्णत्वास येत असलेले हे रुग्णालय तातडीने कार्यान्वित व्हावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते सत्यव्रत दत्ता व धरमदास बागडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. १०० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयामध्ये ओपीडी, नेत्ररोग, ईसीजी, प्रयोगशाळा, फिजिओथेरपी, रक्तपेढी, एक्स-रे, स्त्रीरोग, प्रसूती, बालरोग, सोनोग्राफी, शस्त्रक्रिया, अतिदक्षता, दंतचिकित्सा इत्यादी वैद्यकीय सुविधा राहणार आहेत. १७ जानेवारी २०१३ रोजी मंजूर हे रुग्णालय बांधण्यासाठी २ मे २०१८ रोजी एन. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला कार्यादेश दिला गेला. त्यानंतर हे काम १ मे २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, प्रशासकीय अडचणी व कोरोनामुळे रुग्णालय बांधण्यास विलंब झाला. दरम्यान, न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आवश्यक आदेशांमुळे रुग्णालयाच्या कामांना गती मिळाली. आतापर्यंत रुग्णालयाची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाला ९ कोटी ७२ लाख रुपये अदा केले आहेत.