नागपूर : काेराेनाच्या आधीपासून तलाठी संवर्गातील पदाच्या भरतीची तयारी करीत असलेल्या तरुणांची प्रतीक्षा संपताना दिसत नाही. भरतीसाठी राज्य सरकार व महसूल विभागाची मान्यता मिळाल्यानंतर लवकरच हाेईल, अशी अपेक्षा हाेती. राज्याचे महसूल मंत्री यांनी २०२२ च्या डिसेंबर अखेरपर्यंत भरती हाेईल, असे आश्वासित केले हाेते; मात्र नवीन वर्षात जानेवारीचे १५ दिवस लाेटूनही भरतीची जाहिरात न आल्याने तयारी करणाऱ्या तरुणांची चिंता वाढली आहे.
राज्यात तलाठी संवर्गाची एकूण १२,६३६ पदे आहेत. यापैकी ८५७४ पदे स्थायी असून त्यापैकी १०२८ पदे रिक्त आहेत. पुनर्रचित सज्जानुसार ३१६५ पदे रिक्त आहेत. साेबतच मंडळ अधिकाऱ्यांची ५२८ पदे रिक्त आहेत. राज्य तलाठी महासंघाने २०१४ मध्ये तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची पदे भरण्याची मागणी केली हाेती. ती प्रत्यक्षात येण्यासाठी तब्बल ८ वर्षे लागली. महासंघाच्या मागणीनंतर नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमण्यात आली. या समितीने २०१६ अहवाल दिला. त्यानंतर महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करण्यात आली. या समितीने २०१७ मध्ये अहवाल दिला. या अहवालाला सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागाने २८ जानेवारी २०२२ ला मान्यता दिली. त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेतील उच्चस्तरीय समितीने २९ एप्रिल २०२२ ला मान्यता दिली. त्यानुसार ३११० तलाठी सज्जे आणि ५१८ मंडळ अधिकारी अशा ३६२८ पदाच्या भरतीला महसूल विभागाकडून मान्यता देण्यात आली.
पाेलिस भरतीपाठाेपाठ तलाठी भरतीच्या घाेषणेने तरुणांना नाेकरी मिळण्याची संधी मिळाली आहे; मात्र डिसेंबर लाेटून जानेवारीही जात असताना भरतीची जाहिरात निघाली नसल्याने प्रतीक्षा कधी संपेल, हा प्रश्न तरुणांना पडला आहे.
विविध विभागातील पदांची स्थिती
विभाग - तलाठी सज्जे - मंडळ अधिकारी
- नागपूर - ४७८ - ८०
- अमरावती - १०६ - १८
- पुणे - ६०२ - १००
- औरंगाबाद - ६८५ - ११४
- नाशिक - ६८९ - ११५
- काेकण - ५५० - ९१
एकूण - ३११० - ५१८