नागपूर : केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत केलेल्या घोषणेनुसार पीएफ खात्यांमध्ये ८.५ टक्के दराने वर्ष २०२०-२१ च्या व्याजाची रक्कम जुलै अखेरपर्यंत जमा करण्यात येणार होती. परंतु आता दोन दिवस शिल्लक असताना ही रक्कम खात्यात जमा न झाल्यामुळे भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) खातेधारक पीएफच्या व्याजाच्या रकमेची वाट पाहत आहेत.
जमा असलेल्या रकमेवर सर्वाधिक व्याज पीएफ खात्यात मिळत असल्यामुळे नोकरदार वर्ग दरवर्षी पीएफच्या व्याजाची रक्कम कधी आपल्या खात्यात जमा होते याची वाट पाहतात. यावेळीही तसेच पाहावयास मिळत आहे. खातेधारक मागील काही दिवसांपासून आपले ऑनलाईन पीएफचे पासबुक उघडून पीएफच्या व्याजाची रक्कम खात्यात जमा झाली की नाही हे पाहत आहेत. दरम्यान ईपीएफओने खातेधारकांच्या खात्यात ८.५० टक्क्यांपैकी ६.५० टक्के व्याज जमा केले असून उर्वरीत २ टक्के व्याज आगामी काही दिवसात जमा करण्यात येणार आहे, अशी अफवा शहरात पसरली आहे. या अफवेमुळे खातेधारकात संभ्रम निर्माण झाला आहे. ईपीएफओ कार्यालयाच्या वतीने पीएफ खातेधारकांना अशा अफवेवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला असून खातेधारकांना एकमुश्त ८.५० टक्के व्याजाची रक्कम मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे ईपीएफओ नागपूर कार्यालयांतर्गत सहा जिल्ह्यातील १४.५ लाख पीएफ खातेधारक जुळलेले आहेत.
.........
एकमुश्त जमा होणार व्याज
‘ईपीएफओने पीएफ खातेधारकांच्या् खात्यात आतापर्यंत २०२०-२१ च्या व्याजाची रक्कम जमा केलेली नाही. खातेधारकांना एकमुश्त ८.५० टक्के दराने व्याज मिळणार आहे. त्यासाठी व्याजाची ६.५० टक्के रक्कमेची व्यवस्था करण्यात आली आहे. तर उर्वरीत २ टक्के रकमेची व्यवस्था करण्यात येत आहे. आधी मिळालेल्या सूचनेनुसार जुलै अखेरपर्यंत व्याज जमा केले जाणार आहे. परंतु सध्या वरिष्ठ पातळीवरून याबाबत कोणतीच सूचना मिळालेली नाही.’
- विकास कुमार, आयुक्त क्षेत्रीय भविष्य निधि (१)
.........