एक लाखावर विद्यार्थ्यांना फटका : महाविद्यालयांचा निष्काळजीपणा नागपूर : समाजकल्याण विभागातर्फे एससी, एसबीसी, व्हीजेएनटी व ओबीसी विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१६-१७ या सत्रात समाजकल्याणच्या नागपूर उपायुक्त कार्यालयाला ३, ५७,८६५ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले. यातील २,३८,००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली. परंतु महाविद्यालयाच्या निष्काळजीपणामुळे अजूनही ५८,६४१ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून प्रलंबित आहे, तर जिल्हा पातळीवर ५७,५९६ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या प्रलंबित आहे. नागपूर विभागांतर्गत नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली व भंडारा या जिल्ह्यातून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी २०१६-१७ या वर्षात ३,५७,८६५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी विभागाने ४२३१ विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारले. तर २,३७,३९७ अर्जाला मंजूरी देण्यात आली. यातील १,७१,००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. परंतु महाविद्यालय पातळीवरून ५८६४१ विद्यार्थ्यांचे अर्ज विभागाकडे पोहचू शकले नसल्याने या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या प्रलंबित आहेत. तसेच जिल्हा पातळीवर ५७५९६ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या प्रलंबित आहे. शिष्यवृत्तीच्या अर्जाचा वेळेवर भरणा महाविद्यालयाला साधारणत: जुलै महिन्यात सुरुवात होते. विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिष्यवृत्तीचे अर्ज भरल्यानंतर अर्जाच्या हार्ड कॉपीसह आवश्यक कागदपत्रे जोडून महाविद्यालयाकडे सादर करावी लागतात. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी होऊन, जिल्हा समाजकल्याण कार्यालयाकडे सादर करावी लागते. जिल्हा समाजकल्याण कार्यालय पुन्हा छाननी करून अर्जाला मान्यता देते. परंतु महाविद्यालयाकडून जिल्हा समाजकल्याण कार्यालयाला ऐन वेळेवर अर्ज पाठविले जातात. सप्टेंबरमध्ये महाविद्यालयांकडून जिल्हा कार्यालयाला केवळ २६०० अर्ज आले होते. तर जानेवारीमध्ये २६,०००, फेब्रुवारीला ६२,९०५ तर मार्चमध्ये ६०००० अर्ज जिल्हा कार्यालयाला प्राप्त झाले. वेळेवर आलेल्या अर्जांची छाननी करणे अडचणीचे जात असल्यामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित राहते.
शिष्यवृत्ती कधी मिळेल ?
By admin | Published: May 04, 2017 2:13 AM