तीन दिवस होऊनही अटक नाही : उलटसुलट चर्चा नागपूर : पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिचा अनन्वित छळ केल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी हॉटेल व्यावसायिक हरदिपसिंग अरोरा आणि त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांवर २० मे रोजी गुन्हा दाखल केला. मात्र, तीन दिवस होऊन एकाही आरोपी सदस्याला पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. हरदिपसिंगचा जुलै २०१५ मध्ये एका बड्या कुटुंबातील तरुणीसोबत (वय १९) मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. लग्नात मनासारखे मिळाले नाही, असे सांगून अरोरा परिवारातील सदस्य हरदिपसिंगच्या पत्नीला त्रास देत होते. तर, हरदिपसिंग तिच्यावर नेहमीच अनैसर्गिक अत्याचार करीत होता. सासरच्या मंडळीसोबत नवऱ्याकडूनही होणारा छळ असह्य झाल्याने हरदिपसिंगच्या पत्नीने माहेरच्यांना कल्पना दिली. बँकाँकमध्ये घडलेला प्रकारही सांगितला. मात्र, वाद वाढू नये म्हणून हरदिपसिंगच्या सासरच्या मंडळींनी प्रतिष्ठितांना सोबत घेऊन दोन्ही कुटुंबीयांची समोरासमोर बैठक घेतली. अरोरा परिवारातील सदस्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले. मात्र, या बैठकीत तोडगा निघण्याऐवजी वाद जास्तच वाढला. त्यानंतर प्रकरण गुरुद्वारा समितीसमोर गेले. तेथे समुपदेशन झाल्यानंतरही त्रास कमी होत नसल्याने अखेर हरदिपसिंगच्या पत्नीने पोलिसांकडे धाव घेतली. जरीपटका, सदर पोलिसांकडून तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ झाल्याने तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. तिची कैफियत ऐकून घेतल्यानंतर अंबाझरी पोलिसांना तक्रार नोंदवून घेण्याचे वरिष्ठांनी आदेश दिले. त्यानंतर २० मे रोजी अंबाझरी पोलिसांनी आरोपी हरदिपसिंग अरोरा, तेजपालसिंग अरोरा, अजिंदरकौर अरोरा, संदीपसिंग तेजपालसिंग अरोरा आणि ईशा अरोरा विरुद्ध हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देणे, मारहाण करणे, विनयभंग करणे आणि हरदिपसिंगविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार करण्याचा गुन्हा दाखल केला. आता याला तीन दिवस झाले तरी एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांनी यश मिळवले नाही. (प्रतिनिधी)
कुठे आहे आरोपी हॉटेल व्यावसायिक?
By admin | Published: May 23, 2016 2:57 AM