भिवापूर : कोविड सेंटरमधील कंत्राटी मनुष्यबळ कार्यमुक्त करण्यात आल्याने तपासणी, निदान, उपचार असे सर्व काही ठप्प आहे. त्यामुळे कोविड तपासणीसाठी आलेल्या अनेकांना तपासणीविनाच परतावे लागत आहे. यात एका गर्भवती महिलेचा सुध्दा समावेश आहे.
गत १९ तारखेपर्यंत तालुकास्थळावरील ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीत कोविड सेंटर तर भिवापूर एज्यू. सोसायटी शाळेमध्ये कोविड तपासणी केंद्र सुरू होते. या दोन्ही सेंटरमध्ये कार्यरत मनुष्यबळ कंत्राटी होते. जिल्हास्तरीय यंत्रणेच्या आदेशानुसार २० जुलैपासून कंत्राटी मनुष्यबळ कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे तपासणी, निदान, उपचार ठप्प आहे. अशातच तालुक्यातील ग्रामीण भागातून दोन महिला व लगतच्या आंबोली (जि.चंद्रपूर) येथील शितल विनोद मोरे ही गर्भवती महिला गुरुवारी दुपारच्या सुमारास कोविड तपासणीसाठी सेंटरमध्ये आली. मात्र सेंटर बंद होते. त्यामुळे या गर्भवती महिलेसह अन्य दोन महिलांना तपासणीविनाच परतावे लागले. यासंदर्भात सदर महिलेचे पती विनोद मोरे यांनी सांगितले की, पत्नी गर्भवती असून डॉक्टरांनी कोविड तपासणीचा सल्ला दिला आहे. त्यामुळेच आम्ही येथे तपासणीसाठी आलो. मात्र केंद्र बंद झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता कोविड तपासणी कुठे करावी, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला होता. भिवापूर तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. शिवाय तालुक्यातील शासकीय व खाजगी आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे. अशातच कोविड सेंटर व तपासणी केंद्र बंद झाल्याने रुग्णांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे कोविडसंबंधी संपूर्ण यंत्रणा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आरोग्य केंद्रस्तरावर तपासणी
कंत्राटी मनुष्यबळ कार्यमुक्त केल्यामुळे शहरात कोविड तपासणी बंद आहे. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविड तपासणी सुरू आहे. ही तपासणी आरोग्य विभागाचे कर्मचारी करीत आहे. शहरवासीयांनी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर तपासणीसाठी जावे. असा सल्ला आरोग्य विभागातील काहीजण देत आहे, हे कितपत योग्य असा प्रश्न विचारला जात आहे.
220721\3437img_20210722_133129.jpg
कोविड तपासणीसाठी आलेली गर्भवती महिला. माञ सेंटर बंद असल्यामुळे तिला तपासणीविनाच परत जावे लागले.