नागपूर : कोरोनामुळे यंदा दहाज्चा निकाल नववीच्या वर्गाच्या निकालावरून लावायचा आहे. हा निकाल लावत असताना जिल्ह्यात गेल्यावर्षी नवव्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि दहावीला प्रत्यक्ष अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या यात मोठी तफावत आहे. जवळपास १३ हजारांवर विद्यार्थ्यांनी दहावीसाठी बोर्डाकडे अर्जच केला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे हे विद्यार्थी गेले कुठे? असा सवाल पुढे येत आहे. कोरोनामुळे यंदा शाळा नियमित होऊ शकल्या नाही आणि शिक्षणाचे संपूर्ण सत्र खोळंबल्याने अनेक विद्यार्थ्यांनी ड्रॉप घेतल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोनाचा फटका दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. नागपूर बोर्डाकडे एप्रिल २०२१ च्या परीक्षेसाठी झालेल्या नोंदणीवरून लक्षात येते की, हजारो विद्यार्थ्यांनी यावर्षी ड्रॉप घेण्याची मानसिकता बनविली आहे. दहावी आणि बारावी हे वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. या परीक्षांमध्ये चांगला स्कोअर केल्यानंतर ते आपल्या भविष्याची दिशा ठरवू शकतात. कोरोनामुळे २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायकच ठरले आहे. शाळा, शिकवणी वर्ग बंद असल्याने, अभ्यासाचे वातावरण विद्यार्थ्यांना यंदा मिळाले नाही. ग्रामीण भागात तर ऑक्टोबरपर्यंत कुठल्याच हालचाली नव्हत्या. ऑक्टोबरनंतर ग्रामीणमध्ये काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले; पण तांत्रिक अडचणीमुळे अध्यापन आणि अध्ययन शक्य झाले नाही. १४ डिसेंबरपासून ग्रामीणमध्ये शाळा सुरू झाल्या खऱ्या; मात्र ५० टक्के विद्यार्थी शाळेत आलेले नाही. शहरातील काही शाळांनी ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण केले; पण ऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यास झाला नाही. फेब्रुवारी महिन्यात पुन्हा कोरोनाने तोंड वर काढल्याने जिल्ह्यातील शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या.
- दृष्टिक्षेपात
जिल्ह्यात नववीतील विद्यार्थ्यांची नोंद - ७६६२१
जिल्ह्यात दहावीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या - ६२७०७
- यंदा परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता नाही
यंदा विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारीच झाली नाही आणि शिल्लक असलेल्या वेळेत तयारी पूर्ण होणे शक्यच नाही. त्यामुळे यंदा परीक्षेतून ड्रॉप घेऊन, पुढच्या वर्षी परीक्षेची तयारी करावी, अशी विद्यार्थी व पालकांची मानसिकता झाली आहे. नाही तरी वर्ष गेलेलेच आहे, उरलेल्या वेळेत विद्यार्थी काय साध्य करतील, अशी पालकांचीही भूमिका आहे. त्यामुळे नववीतून पास झालेल्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा देणे टाळले असेल.
डॉ. जयंत जांभूळकर, शिक्षणतज्ञ
- हेही कारणे तितकेच महत्त्वाचे
आरटीई कायद्यानुसार आठव्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना नापास करता येत नाही; पण नवव्या वर्गात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर लक्षात घेता, शाळा निकाल पडू नये म्हणून विद्यार्थ्यांना नापास करतात, हे त्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. दुसरे असे की कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि मोठ्या प्रमाणात स्थलांतरण झाले. स्थलांतरणाचाही परिणाम झाल्याने ड्रॉपर्स वाढले आहे. मुलींची संख्या कमी होण्यात बालविवाहासारखे विषय नाकारता येणार नाही. कारण लॉकडाऊनच्या काळात महिला व बालकल्याण विभागाने मोठ्या प्रमाणात बालविवाह रोखले आहे. त्यामुळे ही कारणेही तेवढीच महत्त्वाची आहे.
दीनानाथ वाघमारे, संयोजक, संघर्ष वाहिनी