नागपूर : सेमिनरी हिल्सवरील विभागीय अंडी उबवणी केंद्रात बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ८५०० कोंबड्या मारण्यात आल्याने कुक्कुट पालन उद्योगात खळबळ उडाली आहे. हा विषाणू नेमका पोल्ट्रीत आला कसा आणि ताे पसरला किती, याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी झुनोटिक आजारांचे संशोधन करणाऱ्या २० जणांची ‘रॅपिड एक्शन टीम’ सक्रिय झाली असून विषाणूच्या स्राेतांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.
फुटाळा तलावालगत काहीजण उंटाची सफारी घडवून आणतात. ते उंट रात्री पोल्ट्री फार्मला लागून असेल्या रस्त्यावर बांधले जातात. सोबतच ज्या पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांना बर्डफ्लूची लागण झाली त्याच्या अगदी समोर घोड्यांचा देखील तबेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरपी) या दोन्ही संशयीत सोर्सचे नमुने घेऊन ते पुण्यातील आर. डी. आय. लॅबला पाठविणार आहे. त्यामुळे ही टीम विषाणूच्या जनुकीय संक्रमणावरही लक्ष केंद्रीत करणार आहे.
१० किलोमिटर परिघात सर्वेक्षण
अंडी उबवणी केंद्रात बर्डफ्लूची लागण झाल्यानंतर एक्टिव्ह मोडवर आलेली रॅपिड रिस्पॉन्स टीम १० किलोमिटरच्या परिघात सर्वेक्षण करणार आहे. माहितीनुसार सध्या १ किमीच्या परिसरातील काेंबड्या मारण्यात आल्या आहेत. ३ किमीपर्यंतच्या पक्ष्यांचे नमुने गाेळा करण्यात आले आहेत. विषाणूचे जनुकीय संक्रमण झाल्यास धोका वाढू शकतो, म्हणून पुढचा महिनाभर ही टीम या १० किलोमिटरच्या परिघातील पाळीव प्राणी, स्थलांतरीत पक्षी, कोंबड्यांचे नमुने तातडीने पुणे येथील रिजनल डिसिज इन्व्हेस्टिगेशन लॅब (आरडीआयएल) आणि भोपाळ येथील हाय सेक्युरिटी लॅब (एचएसएल) ला पाठविले जाणार आहेत.
नवापूर साथ नियंत्रणात नागपूरचे योगदान
महाराष्ट्रात सर्वांत प्रथम २००६ मध्ये बर्डफ्लूच्या साथीचा उद्रेक झाला होता. गुजरातच्या सिमेवरील नंदूरबार-धुळे येथील नवापूर येथे बर्डफ्लूचा उद्रेक झाला होता. त्यावेळी नागपुरातील पशुवैद्यक संशोधकांच्या २५ हून अधिक जणांच्या टीमने ही साथ आटोक्यात आणली होती. नागपूरच्या टीमकडे हा अनुभव असल्याने अंडी उबवणूक केंद्रातील साथही आटोक्यात येण्याची आशा आहे.
पॅनिक होण्याचे कारण नाही
नवापूर साथ नियंत्रणात नागपूर पशुवैद्यकांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे बर्डफ्लूचा ताजा उद्रेक पाहता केंद्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईननुसार सर्व टिम आणि संशोधकांना सक्रिय करण्यात आले आहे. अर्थव्यवस्थेत पोल्ट्री उद्योगाचे योगदान मोठे आहे. त्यामुळे तुर्तास पॅनिक होण्याचे कारण नाही. -डॉ. अजय पोहरकर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद
पशुसंवर्धन विभागाने बर्ड फ्लूच्या शाेधासाठी रॅपिड रिस्पाॅन्स टीम तयार केली आहे. त्यानुसार सर्व संस्थांना निर्देश देण्यात आले आहेत. सर्व केंद्राची तपासणी सुरू असून आतापर्यंत कुठेही पक्ष्यांचा मृत्यु झाल्याची नाेंद मिळाली नाही. - मंजुषा पुंडलिक, पशुसंवर्धन आयुक्त, नागपूर