अधिकारी म्हणतात शोध सुरू : घटनेला महिना लोटला नागपूर : गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमधील पिंजऱ्यातून अचानक गायब झालेल्या बिबट्याचा अजूनपर्यंत कुठेही सुगावा लागलेला नाही. दुसरीकडे या घटनेला एक महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लोटला असून, वन अधिकारी मात्र अजूनही शोध सुरू असल्याचे सांगत आहे. चक्क वन विभागाच्या पिंजऱ्यातून बिबट गायब होण्याची ही कदाचित राज्यातील पहिलीच घटना असावी. परंतु असे असताना वन विभागाने या घटनेवर मौन बाळगले आहे. शिवाय अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या (एमझेडए) नागपुरातील मुख्यालयाने मागील काही दिवसांपूर्वी गोरेवाडा वन विभागाला एक पत्र जारी करून, तो ‘बिबट’ अचानक पिंजऱ्यातून कसा पळाला, यावर सविस्तर उत्तर मागितले होते. त्याचवेळी गोरेवाडा येथील वन अधिकाऱ्यांनी येथील जंगलात काही कॅमेरा ट्रॅप लावून त्या बिबट्याचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले आहे. मात्र या जंगलाचे क्षेत्र लक्षात घेता, आतापर्यंत तो बिबट कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद होणे अपेक्षित होते. परंतु अजूनपर्यंत तो कुठेही दिसून आला नसल्याचे येथील एका वन अधिकाऱ्यानी सांगितले. त्यावर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी गोरेवाडा येथील वन परिक्षेत्र अधिकारी राठोड आणि वनपाल कडू यांच्याशी संपर्क साधला असता, दोघांनीही काहीही न बोलता फोन कापला.(प्रतिनिधी)
गोरेवाड्यातील बिबट गेला कुठे?
By admin | Published: February 13, 2017 2:37 AM