लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंग्लंड येथून नागपुरात परतलेली एक तरुणी मंगळवारी मेडिकलचा विशेष वॉर्ड पाहून गेली. परंतु पुन्हा ती आलीच नाही. ही तरुणी पॉझिटिव्ह असल्याची सूत्राची माहिती आहे. ती तरुणी गेली कुठे? असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, या तरुणीने मेडिकलचे केसपेपर तयार केले नव्हते यामुळे मेडिकल प्रशासनाला याची नोंद नाही. महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून ही युवती आली नसल्याने त्यांनाही या विषयी काहीच माहिती नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराने ब्रिटनमध्ये खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. युरोप, मिडल ईस्ट, साऊथ आफ्रिकामधून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. सध्या चार प्रवासी विलगीकरणात आहे, आणि जे २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान विदेशातून नागपुरात परतले अशा १७० जणांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. आतापर्यंत सुमारे ६० जणांची तपासणी झाली आहे. यातील पाच पॉझिटिव्ह आले आहेत. यांच्यावर मेडिकलच्या विशेष वॉर्डात उपचार सुरू आहेत. यातील एक सुरुवातीला पॉझिटिव्ह आणि नंतर निगेटिव्ह आलेला आहे. तर एक रुग्ण निगेटिव्ह असताना त्याच्या सीटी स्कॅनमध्ये बदल असल्याने त्याला उपचाराखाली ठेवण्यात आले आहे. सध्या तीन पुरुष व दोन महिला भरती आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सात दिवसांच्या उपचारानंतर त्यांना सुटी दिली जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार, निगेटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेले सुमारे चार जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर, महिला रुग्णांमधील एक रुग्ण अकोल्याला जाऊन आली होती. त्यांच्या संपर्कात आलेले आणखी दोघांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यामुळे अकोला जिल्हाधिकारी यांनी कोरोनाबाबत अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. यातच मेडिकलमधील आजच्या प्रकारामुळे नियोजनाला घेऊन आणखी प्रश्न निर्माण झाले आहे.
सूत्रानुसार, आज दुपारच्या दरम्यान एक युवती मेडिकलच्या विशेष वॉर्डात आली. तिने वॉर्डाची पाहणी केली. या दरम्यान तेथील एका निवासी डॉक्टरांनी तिला हटकल्यावर तिने काही दिवसांपूर्वी इंग्लंडवरून आल्याचे व पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. डॉक्टरांनी केसपेपर तयार करावे लागतील असे सांगून थांबण्यास सांगितले. परंतु ती तरुणी न थांबताच निघून गेली. यामुळे ही तरुणी खोटे तर बोलत नव्हती ना, अशी शंका आहे. महानगरपालिकेचे सहआयुक्त व कोरोनाचे नोडल अधिकारी संजय निपाने यांना याबाबत विचारल्यावर त्यांनाही कुठलीही माहिती नसल्याचे सांगितले.