- खासगी हॉस्पिटल्स रुग्णांना धरताहेत वेठीस : पुन्हा काळाबाजार सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमित रुग्णांचा जीव रेमडेसिविरच्या तुटीमुळे धोक्यात येऊ नये म्हणून सोमवारीच मोठ्या प्रमाणात शहरात या इंजेक्शनचा पुरवठा झाला आहे. प्रत्येक खासगी कोविड हॉस्पिटल्समध्ये तेथील आयसीयू बेड्सच्या अनुषंगाने रेमडेसिविर मुबलक प्रमाणात पुरविण्यात आले. मात्र, या एकाच दिवसात पुन्हा एकदा रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्याची ओरड हॉस्पिटल्सवाले रुग्णांच्या नातेवाईकांपुढे करत असल्याचे चित्र आहे. एकाच दिवसात रेमडेसिविर संपले कसे, रुग्णांच्या स्थितीचा लाभ घेत नातेवाईकांकडून पैसे उकळण्यासाठी ही कृत्रिम टंचाई तर नव्हे ना, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
सद्यस्थितीत कोरोना उपचारात रेमडेसिविर इंजेक्शन संजीवनी ठरत असल्याने शासनाने विक्रीवर अनेक निर्बंध लादले. शासकीय हॉस्पिटल्सना या इंजेक्शनचा साठा मुबलक करण्यात आला तर खासगी इस्पितळांसाठी काही औषधालयांनाच या इंजेक्शनची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, यामुळे मोठ्या प्रमाणात रेमडेसिविरचा काळाबाजार फोफावला. ५७७ ते ५,४०० रुपये मूळ किंमत असलेले हे रेमडेसिविर इंजेक्शन प्रारंभिक दिवसात १० हजार रुपयाला तर सोमवारपर्यंत २५ हजार रुपयाला एक असे उपलब्ध व्हायला लागले. सोमवारी शहरातील सर्व खासगी कोविड इस्पितळांना अतिदक्षता विभागात असलेल्या बेड्सच्या संख्येनुसार मुबलक प्रमाणात रेमडेसिविर उपलब्ध करवून देण्यात आले. रुग्णांना मंगळवारी कोणत्याही त्रासाशिवाय हे इंजेक्शन मिळालेसुद्धा. मात्र, बुधवारी हाॅस्पिटल्समधील डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविरसाठी वेठीस धरण्यास सुरुवात केली. त्यामुळे रेमडेसिविरसाठी नातेवाईकांची पुन्हा एकदा पायपीट सुरू झाली. याबाबत ‘लोकमत’ने संबंधित हॉस्पिटल्सच्या संचालकांशी संपर्क साधला असता, प्रकरण अंगावर येत असल्याचे लक्षात येताच पटापट रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करून रेमडेसिविर हॉस्पिटलमध्येच उपलब्ध झाल्याचे सांगण्यास सुरुवात केली. अशा तऱ्हेने रेमडेसिविरच्या काळ्या बाजारात खासगी हॉस्पिटल्स सहभागी असल्याचे स्पष्ट व्हायला लागले आहे.
----------------
नव्या साठ्याचे ऑडिट होण्याची गरज
११ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ‘ई’ व ‘एफ’ श्रेणीतील अत्यावश्यक रुग्णांनाच रेमडेसिविर देण्याचे आदेश निर्गमित केले आहे. या आदेशाचे पालन न झाल्याच्या स्थितीत कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. शिवाय, एका रुग्णाला एका दिवशी एकच रेमडेसिविर देणे बंधनकारक आहे. मात्र, सोमवारपर्यंत डॉक्टर्स रुग्णांना एकाच वेळी सहा-सहा रेमडेसिविर आणण्यास सांगत होते. यामुळेही मोठ्या प्रमाणात काळा बाजार फोफावला होता. आता नवा साठा प्राप्त झाला असून, प्रत्येक हॉस्पिटल्सला किती रेमडेसिविर पुरविण्यात आले, याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे आहे. असे असतानाही खासगी हॉस्पिटल्स रुग्णांच्या नातेवाईकांना वेठीस धरत आहेत. यावर जिल्हा व मनपा प्रशासनाने समिती नेमून रेमडेसिविर कोणाला, किती व कधी दिले, याचे आकडे तपासून प्रत्येक खासगी कोविड हॉस्पिटलचे ऑडिट करण्याची गरज आहे.
................