नागपूर : आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी सना खान यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. जबलपूरमधील गुन्हेगार अमित साहू याचा नोकर जितेंद्र गौड याच्या चौकशीदरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याने अमितच्या कारमधील रक्त धुतल्याची माहिती दिली आहे; मात्र सना यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याच्या वृत्ताबाबत अद्याप पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.
४० वर्षीय महिला पदाधिकारी सना खान या १ ऑगस्टला अमित साहूला भेटण्यासाठी गेल्या होत्या. २ ऑगस्टला सकाळी त्यांनी आईला फोन करून जबलपूरला पोहोचल्याचे सांगितले. तेव्हापासून त्या बेपत्ताच होत्या. अमित साहू हा जबलपूरचा गुन्हेगार आहे. २ ऑगस्टला संध्याकाळी सना यांच्या आईने अमित साहूला संपर्क केला होता; मात्र त्याच्या बोलण्यातून संशय आल्याने त्यांनी मानकापूर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.
मानकापूर पोलिसांनी तत्काळ जबलपूरला एक पथक पाठवून मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने महिला पदाधिकाऱ्यासह अमित साहू आणि त्याचा भाऊ मनीष यांचा शोध घेतला. तिघांचाही काहीच सुगावा लागलेला नव्हता. तपासादरम्यान पोलिसांना त्याचा नोकर जितेंद्र गौडवर संशय आला. इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. त्याने चौकशीदरम्यान अमितची गाडी धुतल्याची कबुली दिली. गाडीत रक्त सांडले होते व त्याच्या सांगण्यावरून गाडी स्वच्छ केल्याची त्याने माहिती दिली.
ठोस माहिती किंवा पुरावा मिळाला नाही
नागपूर पोलिसांचे पथक जबलपूरला गेले असून तेथे तपास सुरू आहे. पोलिसांनी त्याने सांगितलेल्या नदीच्या परिसरातदेखील शोधाशोध केली; मात्र कुठलाच सुगावा लागलेला नाही. याबाबत मानकापूरच्या ठाणेदार शुभांगी वानखेडे यांना संपर्क केला असता त्यांनी नोकराला अटक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला; मात्र त्यांची खरोखरच हत्या झाली आहे का याबाबत ठोस माहिती किंवा पुरावा मिळाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.