लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील महाविकास आघाडीचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. सातबारा कोरा करू, हेक्टरी २५ हजारांची मदत करण्याचे आश्वासन दिले. परंतु शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई व मदत मिळालेली नाही. सातबारा कोरा करायचा तर यासाठी ५० हजार कोटी कसे आणणार, सत्ता स्थापन होताच आश्वासन देणारे कुठे लपून बसले असा सवाल भाजपचे परिणय फुके यांनी गुरुवारी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केला.महाविकास आघाडी सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडणारे आहे का अशी शंका येते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी ५० हजार कोटींची तरतूद कशी करणार याचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात नाही.हैदराबाद येथील महिला आत्याचाराच्या प्रकरणानंतर आंध्रप्रदेश सरकारने गुन्हेगारांना २१ दिवसात फाशी देण्याचा कायदा केला आहे. गुन्हेगारांत धाक निर्माण करण्याठी असा निर्णय राज्य शासनाने घेतल्यास किंवा तशी भूमिका घेतल्यास महिलांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल, अशी भूमिका फुके यांनी मांडली. महाविकास आघाडी सरकारने गेल्या २० दिवसात फक्त स्थगिती देण्याचे काम केले. विकास कामे प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करूनच मंजूर केली जातात. असे असताना कुठलेही ठोस कारण न देता विकास कामांना स्थगिती दिली जात आहे. विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे नक्षलप्रभावित आहेत. ह्या भागातील आदिवासीचा सर्वांगीण विकास करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्या सुरक्षेची हमी इत्यादी बाबींचा या अभिभाषणात काहीच उल्लेख नसणे हे खेदजनक आहे. आदिवासीसाठी शासनाने कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे.विदर्भातील जनतेला मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी सुलभतेने मिळावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे स्वतंत्र कक्ष सुरू केला होता. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सुध्दा या कक्षातून अनेक गरजूना लाभ झाला होता. नवीन सरकारने हा कक्ष बंद केला असून तो सुरू करावा म्हणजे विदर्भातील जनतेला न्याय मिळेल,असे फुके यांनी म्हटले.
सातबारा कोरा करू म्हणणारे सत्ता येताच कुठे लपले? परिणय फुके यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:00 AM
सातबारा कोरा करायचा तर यासाठी ५० हजार कोटी कसे आणणार, सत्ता स्थापन होताच आश्वासन देणारे कुठे लपून बसले असा सवाल भाजपचे परिणय फुके यांनी गुरुवारी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केला.
ठळक मुद्दे२५ हजार हेक्टरी मदत कधी मिळणार : सातबारा कोरा करण्यासाठी ५० हजार कोटी कसे आणणार