निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील ऐतिहासिक फुटाळा तलावाबाबत आलेल्या एका माहितीने पर्यावरण तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. या तलावाचा जलस्तर ३ ते ४ फूट घटल्याची माहिती समाेर आली आहे. असे हाेत राहिले, तर एक दिवस तलावाचे पाणी दिसेनासे हाेईल, आणि त्याचे अस्तित्वच धाेक्यात येइल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र असे का हाेत आहे, हा प्रश्न आहे. खरंतर यावेळी तलावाचे सखाेल सर्वेक्षण हाेणे नितांत गरजेचे आहे. मात्र तलाव किंवा भूजलस्तराच्या अभ्यासाची जबाबदारी असलेल्या संस्था याबाबत गंभीर दिसत नाही.
जलसाठे व भूजल संवर्धनाबाबत कार्य करणारी एनजीओ स्वच्छ असाेसिएशनचे सचिव शरद पालिवाल यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. फुटाळा तलावाचे पाणी कमी हाेत आहे, हा चिंतेचा विषय आहे. यामुळे तलावाचे अस्तित्वच संकटात आले आहे. एक दिवस पाणीच राहणार नाही, तर काेट्यवधी खर्च करून तयार हाेणाऱ्या म्युझिकल फाऊंटनचा आणि साैंदर्यीकरणाचा काय उपयाेग हाेइल, असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तलावाचे पाणी का कमी हाेत आहे, याबाबत त्यांनी शक्यता नाेंदविल्या आहेत; मात्र याेग्य अभ्यास केल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. मात्र त्याकडे कुणाचे लक्ष नाही. साैंदर्यीकरणाच्या कामाकडे लक्ष देताना तलावाच्या खंडित हाेणाऱ्या सुरक्षा भिंतीकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. एक दिवस ही भिंत तलावात खचेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
जलस्तर घटण्याच्या शक्यता
१) तलावाच्या परिसरात साैंदर्यीकरण व म्युझिकल फाऊंटनबाबत बांधकाम हाेत आहे. या कामाच्या कंपनामुळे तलावाचा बांध कुठूनतरी फुटला असावा व त्यातून पाणी झिरपत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे माेठी दुर्घटना हाेण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
२) जमिनीच्या आतमध्ये भूजलसाठे (रिजर्वायर) असतात. काही तलावाच्या आकाराचे असतात, जे भूजल वाहिन्यांशी जाेडलेले असतात. बांधकामाच्या कंपनामुळे या भूजल वाहिन्या खंडित हाेऊन जमिनीतील भूजलसाठे तलावाशी जुळले असू शकते. अशावेळी तलावाचे पाणी अशा भूजलसाठ्यांमध्ये झिरपून कधी नाहीशे हाेईल, पत्तासुद्धा लागणार नाही, अशी भीती पालिवाल यांनी व्यक्त केली.
३) आसपासच्या वस्त्यांमधील सांडपाणी वाहत तलावात जात असल्याने तलावाचे नैसर्गिक स्त्राेत बुजण्याची शक्यता आहे.
४) पावसाचे पाणी ज्या जंगल भागाकडून वाहत तलावामध्ये येते, त्या भागात रस्त्याचे व इतर बांधकाम झाल्याने पाण्याचा प्रवाह खंडित झाला आहे. यामुळेही जलस्तर घटला असल्याचा अंदाज पालिवाल यांनी व्यक्त केला.
काय परिणाम हाेतील?
- फुटाळा तलावाच्या पाण्यामुळे सीताबर्डीपर्यंतच्या विहिरींचा जलस्तर चांगला आहे. त्यामुळेच विहिरी भरल्या आहेत. तलावाचे पाणी घटले, तर या विहिरींची भूजल पातळी विचलित हाेण्याचा धाेका आहे.
- एक दिवस तलावाचे अस्तित्वच नाहीसे हाेईल. त्यावेळी साैंदर्यीकरणाचे काय काम राहणार?
- तलावातील जैवविविधता उदध्वस्त हाेईल.
तलावाचा जलस्तर घटणे गंभीर बाब आहे. यावेळी भूगर्भ शास्त्रविभाग, केंद्रीय व राज्य भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे दखल घेऊन सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. तलाव कोरडा पडल्यास साैंदर्यीकरणाचा उपयाेग राहणार नाही. त्यामुळे तलावाच्या मूलभूत गाेष्टींच्या संवर्धनाकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
- शरद पालिवाल, सचिव, स्वच्छ असाेसिएशन