नागपूर : खवासातील आदिवासींकडून जप्त केलेल्या वाघाच्या हाडांची संख्या आता पाच किलोवर गेली आहे. आपल्या घरामध्ये तब्बल पाच किलोपर्यंत हाडे आणि अवयव दडवून ठेवणाऱ्या या आरोपींचे कनेक्शन नेमके कुठपर्यंत आहेत, हा आता तपासातील महत्त्वाचा भाग आहे. यापूर्वीच्या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता, स्थानिक शिकारीचे संबंध थेट आंतरराष्ट्रीय तस्करांशी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या हाडाच्या खरेदीदारांच्या शोधाचे आता वनविभागापुढे आव्हान आहे.
खवासा प्रकरणात वनविभागाने आतापर्यंत पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. यात बालाराम वरखडे, नरेंद्र कोडवते, रोशन उईके (सीतापार आणि पेंडकेपार) तसेच कैलास भलावी, राहुल भलावी (बनेरा, ता. पारशिवनी) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत वाघाची पाच किलो हाडे जप्त करण्यात आली आहेत. त्याची किंमत नेमकी आकारणी करणे शक्य नसले तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ती प्रचंड आहे. जप्त करण्यात आलेली हाडे नेमकी किती वाघांची आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रयोगशाळेतील परीक्षण अहवालानंतरच हे स्पष्ट होणार आहे. या आरोपींवर मध्य प्रदेशातही गुन्हे दाखल असल्याने त्यांना तपासासाठी त्यांच्याकडे स्वाधीन करण्यात आले आहे.
यासंदर्भात पेंचचे सहायक वनसंरक्षक अतुल देवकर यांच्याशी संपर्क साधला असता, वाघांच्या शिकारीनंतर त्यांच्या हाडांची विक्री करण्याचा प्रकार अंधश्रद्धेतून घडत असल्याचे त्यांनी सांगितले. खरेदीदार मांत्रिक तसेच स्थानिक खरेदीदार असू शकतात, असा अंदाज त्यांनी वर्तविला. आरोपींची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती पुढे आल्यास आंतरराज्यीय टोळीशी संबंध आहे अथवा नाही हे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
...
घटनांचे तीन राज्यात कनेक्शन
या घटनेतील वाघांच्या हत्येचे कनेक्शन छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या तीन राज्यात आहे. विशेषत: विदर्भ, बालाघाट आणि छत्तीसगडमध्ये या घटनेचे तार जुळले आहेत. जबलपूर, नागपूर, रायपूरदरम्यानच सध्याचे रॅकेट संबंधित असल्याचे सध्याच्या तपासात पुढे येत आहे.
...
म्हणून हाडांची घटना चिंताजनक!
वाघांच्या शिकारीएवढीच त्यांची तस्करी जास्त चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील पेंच, ताडोबा या व्याघ्र प्रकल्पांना मागील काळात शिकारी टोळ्यांनी लक्ष्य केले आहे. त्यांचे अवयव आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करी टोळ्यांच्या माध्यमातून विकले जात असल्याची बाब ट्रॅफिक आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ या दोन संस्थांनी यापूर्वीच उघड केली होती. कान्हा, कर्माझरी, पेंच, ताडोबा तसेच सुंदरबन आणि पश्चिम घाटातील जंगलक्षेत्रांना धोका व्यक्त केला होता. उत्तर प्रदेशातील रामनगर, मध्य प्रदेशातील बालाघाट आणि जबलपूर ही शहरे वन्यजीवांच्या अवयव वाहतुकीची केंद्रे असल्याचे वनविभागाकडे नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर हाडे जप्त होण्याची घटना महत्त्वाची ठरली आहे.
...