कुही : तालुक्यातील राजोली पुनर्वसन येथील ग्रामपंचायतच्या खात्यातून नळ दुरुस्तीच्या नावावर पैशाची उचल केल्याचे समोर आले आहे. पुनर्वसनच्या सर्व नळ योजनेच्या दुरुस्तीची जवाबदारी व्ही.आय.डी.सी.कडे दिली आहे. अशात मग हे पैसे नेमके कुणाच्या खिशात गेले, असा प्रश्न तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम रामटेके यांनी केला आहे. राजोली ग्रामपंचायत तालुक्यातील पुनर्वसित ग्रामपंचायत आहे. २०२० मध्ये ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपल्याने तेथे प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. अशात प्रशासकासह सचिवाने नळ दुरुस्तीच्या नावे १ डिसेंबर २०२० ला ३९,९८१ रुपयांची उचल केली आहे. सचिवांनी नेमकी कुठली नळ दुरुस्ती केली, हा प्रश्न सध्या ग्रामपंचायतमध्ये उपस्थित होत आहे. ग्रामपंचायतची निवडणूक झाल्यावर सरपंच पदावर उषा दहिलकर निवडून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी या प्रकरणाची तक्रार पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांकडे केली. मात्र याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. आठ दिवसात या प्रकरणाची चौकशी झाली नाही तर पंचायत समितीसमोर उपोषण करू, असे सरपंच उषा दहिलकर, उपसरपंच जयदेव लोहारे, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम रामटेके, ग्रामपंचायत सदस्य दिनेश रकतसिंगे, राजहंस शेंडे, सुवर्णा हरडे, सारिका देशपांडे, सुनीता लोगडे यांनी सांगितले आहे.
-
सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हा प्रकार माझ्या लक्षात आला. याबाबत गट विकास अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मात्र या प्रकरणाची चौकशी झाली नाही.
-उषा दहिलकर
सरपंच राजोली
-
नळ दुरुस्तीच नाही तर अशा अनेक कामाच्या नावावर ग्रामपंचायतमधून पैशाची उचल झाली आहे. याची चौकशी झालीच पाहिजे.
-उत्तम रामटेके
तंटामुक्ती अध्यक्ष, राजोली