राज्याचा काही भाग अजूनही पावसासाठी आसुसलेला असताना शनिवारी जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान केले आहे. नांदुरा (जि. बुलढाणा) येथे पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. दरम्यान, नागपुरातील पूर ओसरला असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसाने तहानलेल्या मराठवाड्याला दिलासा दिला असून दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
नागपुरात पुराने ५ जणांचा मृत्यू, १० हजार घरांचे नुकसान
नागपूर : नाग नदीला आलेल्या महापुरामुळे नागपुरातील सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून १४ जनावरेही दगावली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीत नागपूरकरांना मोठा फटका बसला. अंबाझरी तलाव पाण्याचा ओव्हर फ्लो होऊन हे पाणी नागनदीत प्रचंड प्रवाहाने शिरले. नदीकाठावरील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे अन्नधान्यासह इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व घटनाक्रमात पाच जणांचा मृत्यू झाला. यात मीराबाई पिल्ले (७०), संध्या ढोरे (८०), संजय गाडेगावकर (५२), कृष्णकुमार लेखराम बरखंडी (२१) आणि एक अनोळखी या मृतांचा समावेश आहे.
रविवारी दुपारपासून नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात झाली. महानगरपालिकेचे ६० कर संग्राहक, १५ महसूल निरीक्षक, १० सहायक अधीक्षक यांची
टीम जिल्हा प्रशासनाच्या दिमतीला आली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी
n उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नुकसानीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश जारी केले. त्यानंतर फडणवीस यांनी रविवारी सकाळी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. n काही वस्त्यांना भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच घरात चिखलामुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली. भविष्यात अशा घटना टाळण्यात येतील, असेही नागरिकांना त्यांनी सांगितले.